‘इनोव्हेशन’च्या माध्यमातून नागपूर जागतिक दर्जाचे शहर करण्याचा मानस

Date:

नागपूर सरकार ज्या काही चांगल्या योजना राबविते त्या म्हणजे ‘इनोव्हेशन’चाच एक भाग आहे. नावीन्यपूर्ण योजनांसाठी आपल्याकडे १८ कोटींचा निधी उपलब्ध आहे. ‘इनोव्हेशन पर्व’च्या माध्यमातून आलेल्या उत्तम संकल्पनांचा वापर उपलब्ध निधीचा वापर करून नागपूर शहराच्या विकासासाठी करावा. युवा संशोधकांनी केलेल्या ‘इनोव्हेशन’च्या माध्यमातून नागपूर जागतिक दर्जाचे शहर करण्याचा आपला मानस असल्याचे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

महापौर नंदा जिचकार यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या नागपूर महानगरपालिका आणि मेयर इनोव्हेशन कौन्सिलच्या संयुक्त विद्यमाने मानकापूर इनडोअर स्टेडियम येथे आयोजित ‘इनोव्हेशन पर्व’चे उद्‌घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते थाटात पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार होत्या. यावेळी मंचावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम, वने व आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, ओबीसी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष अविनाश ठाकरे, आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, गिरीश व्यास, सुधाकर कोहळे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती प्रदीप पोहाणे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गिऱ्हे, मंगळवारी झोन सभापती गार्गी चोपडा, आसीनगर झोन सभापती विरंका भिवगडे, धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरुची राजगिरे, बसपाच्या गटनेत्या वैशाली नारनवरे, कर व कर आकारणी समितीचे उपसभापती तथा ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अग्निशमन व विद्युत समितीचे उपसभापती निशांत गांधी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, इनोव्हेशन पर्वचे नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, महामेट्रोचे प्रबंध संचालक ब्रृजेश दीक्षित, नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, मेयर इनोव्हेशन कौन्सिलचे समन्वयक डॉ. प्रशांत कडू, इनोव्हेशन पर्वचे मुख्य समन्वयक केतन मोहितकर, नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेविका प्रगती पाटील, शिल्पा धोटे, मंगला लांजेवार, नागपूर मेट्रोचे महाव्यवस्थापक अनिल कोकाटे, राजेश गादेवार, प्रवीण डाखोळे यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, यापूर्वी झालेल्या हॅकॉथॉनमध्ये आलेल्या ४०० प्रकल्पांपैकी ९० टक्के प्रकल्पांचा उपयोग राज्य शासनामार्फत विविध विकासकामांमध्ये करण्यात येईल. सरकार निधी उपलब्ध करून देण्याचे कार्य करू शकते. मात्र नवसंकल्पना युवाच देऊ शकतात. नागपूरच्या युवा संशोधकांच्या संकल्पना मांडण्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी महापौर नंदा जिचकार यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. राज्य सरकारमधील विविध ४५ विभागांसाठी प्रति विभाग एक नावीन्यपूर्ण कल्पना इनोव्हेशन पर्वच्या माध्यमातून आली तर त्यासाठी नावीन्यपूर्ण योजनेसाठी असलेला निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. इनोव्हेशन पर्वमधील संकल्पनांचा वापर करून नागपूर शहर जागतिक स्तरावर नेण्याचा आपला मानस आहे. यासाठी सरकार भक्कमपणे युवा संशोधकांच्या पाठीशी आहे. मात्र, युवा संशोधकांनाही त्याचा पाठपुरावा करावा लागेल, असे आवाहन त्यांनी केले. विदर्भाला ‘पर्यटन हब’ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या क्षेत्रात व्यवसायाच्या भरपूर संधी आहे. युवा संशोधकांनी या क्षेत्रासाठी तयार केलेल्या संकल्पना आमंत्रित आहे. त्यांना आकार देण्यासाठी शासन मदत करेल, असे आश्वासनही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले.

‘इनोव्हेशन पर्व’ गौरवशाली : डॉ. परिणय फुके

राज्याचे सार्वजनिक बांधकाम, वने व आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यावेळी बोलताना म्हणाले, संत ज्ञानेश्वरांनी बालवयातच ‘ज्ञानेश्वरी’ची रचना केली. १६ व्या वर्षातच बाल शिवाजी यांनी तोरणा जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. आपण युवा आहात. या वयात आपल्यालाही जागतिक पातळीवर पोहचण्याची संधी आपण केलेले संशोधन देऊ शकते, असे सांगत त्यांनी २० वर्ष वयातच ११७ पेटंट आपल्या नावावर करणारे यशराज भारद्वाज आणि डिलिव्हरी कंपनीचे अध्यक्ष असलेले साहिल बर्वा यांच्या यशोगाथेचे उदाहरण दिले. फेसबुकचे निर्माते, उबेरचे संचालक यांनी आपल्या संकल्पनेतून अद्वितीय व्यवसाय उभारला. आपणही अशा संकल्पना व्यवसायाच्या रूपात परिवर्तीत कराव्या, असे इनोव्हेशन पर्वचे आयोजन गौरवशाली असून अशा व्यासपीठाचा उपयोग करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

‘इनोव्हेशन’चा उपक्रम जागतिक स्तरावर नेण्याचा संकल्प : महापौर नंदा जिचकार

Innovation Parv

इनोव्हेशन पर्वमध्ये ५०० नवसंकल्पना येतील अशी अपेक्षा असताना हजारावर युवा संशोधकांनी नोंदणी केली यातच या उपक्रमाचे यश असल्याचे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले. त्या म्हणाल्या, राष्ट्रउभारणीत युवांचे योगदान मोठे आहे. मानवाच्या डोक्यात अनेक संकल्पना येतात. त्या त्यांनी मांडल्या, त्याचा विकासकार्यात कसा सहभाग करता येईल, याचा विचार केला आणि त्याला व्यवसायात कसे रूपांतरित करता येईल, यादृष्टीने कार्य जर झाले तर भविष्यात भारत देश हा शाश्वत विकासाचे आणि उद्योगनिर्मितचे ‘मॉडेल’ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महापौर इनोव्हेशन अवॉर्ड आणि इनोव्हेशन पर्वच्या निमित्ताने नागपुरातील युवांना एक हक्काचे व्यासपीठ मनपाने उपलब्ध करून दिले आहे. या व्यासपीठावर संकल्पना मांडा, त्या संकल्पनांचा विकासात उपयोग कसा करता येईल, त्याचे उद्योगात रुपांतर कसे करता येईल याबाबत मार्गदर्शही याच व्यासपीठावर मिळेल असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. हा उपक्रम आता जागतिक स्तरावर जात आहे. भविष्यात जगाच्या पाठीवर जिथे कुठे हा उपक्रम होईल, तेथे ‘नागपूर’ शहराचे नाव गौरवाने घेतले जाईल, असे आपले स्वप्न असल्याचे महापौर नंदा जिचकार यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी असे उपक्रम निमित्त ठरेल, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी आमदार सुधाकर देशमुख, आमदार गिरीश व्यास यांनीही मार्गदर्शन केले. नवउद्योजकांना उद्योग विस्तारासाठी देण्यात येणाऱ्या मुद्रा लोनचे सर्वाधिक लाभार्थी महाराष्ट्रात असल्याचा उल्लेख त्यांनी केला. युवांजवळ कल्पना आहे. विचार आहेत. त्यांना पुढे नेण्याचे कार्य त्यांनाच करायचे आहे. इनोव्हेशन पर्व सारखे उपक्रम त्यासाठी लाभकारक ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महामेट्रोचे महाव्यवस्थापक ब्रृजेश दीक्षित यावेळी बोलताना म्हणाले, नागपूर मेट्रोने नेहमी ‘इनोव्हेशन आणि एक्सलेंस’ला चालना दिली आहे. नागपूर मेट्रोचे नावीन्यपूर्ण कार्य हे केवळ देशासाठीच नव्हे तर जगासाठी आदर्श ठरत आहे. अर्थपुरवठा करणाऱ्या जर्मनी आणि फ्रान्स सुद्धा नागपूर मेट्रोकडे ‘इनोव्हेशन’च्या माध्यमातून ‘मॉडेल’ म्हणून बघतात. मेट्रोचे कोच बनविण्याचा कारखानासुद्धा नागपुरात येतोय. लोकसहभाग वाढविण्यासाठी मेट्रो नागरिकांच्या सोयीसाठी विविध योजना आणत आहेत. वाहतूक व्यवस्थेचे एकत्रिकरण, महाकार्ड, ग्रीन एनर्जी अशा नवनवीन संकल्पना नागपूर मेट्रो सत्यात उतरवित असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकातून मेयर इनोव्हेशन कौन्सिलचे समन्वयक डॉ. प्रशांत कडू यांनी उपक्रम आयोजनामागील भूमिका विषद केली. केवळ उपक्रम आयोजन हाच उद्देश नसून यामध्ये येणाऱ्या संकल्पनांचा उपयोग विविध कामांमध्ये कसा करता येईल, यावर कार्य सुरू राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

तत्पूर्वी पालकमंत्री चंद्रशेखर बावनुकळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून ‘इनोव्हेशन पर्व’चे विधीवत उद्‌घाटन करण्यात आले. ‘इनोव्हेशन पर्व’च्या निमित्ताने ‘देशी जुगाड-द इनोव्हेशन हाऊस’ हा एक टिव्ही शो भविष्यात येणार असून त्याच्या पहिल्या पत्रकाचे अनावरण पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ना. परिणय फुके, महापौर नंदा जिचकार व अन्य मान्यवरांनी कार्यक्रम परिसरात लागलेल्या स्टॉल्सला भेट देत माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाचे संचालन सनी फ्रान्सीस यांनी केले. युवा वर्गाच्या उपस्थितीतीने मानकापूर इनोडोअर स्टेडियम खचाखच भरले होते.

मान्यवरांचे मार्गदर्शन आणि तरुणाईसोबत संवाद

उद्‌घाटन सोहळ्यानंतर उपस्थित तरुणाईला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन करीत संवाद साधला. नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांनी ‘इनोव्हेशन’ म्हणजे काय हे सोदाहरण स्पष्ट केले. नियमितपणे करणाऱ्या कृती वेगळेपणाने करता येतील का, याचा विचार करून त्यावर अंमल करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे म्हणजे ‘इनोव्हेशन’ असे त्यांनी सांगितले. इनोव्हेशन करण्यासाठी शिक्षणाची गरज नाही. तुम्हाला कल्पनांचा विस्तार करता यायला हवा, असे सांगत त्यांनी जागतिक स्तरावर विविध शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांची उदाहरणे दिली.

व्हीएनआयटीचे संचालक डॉ. पी.एम. पडोले यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, चाकोरीबाहेर पडून विचार करणे, संकल्पना मांडणे आणि त्या सत्यात उतरविणे म्हणजे इनोव्हेशन आहे. व्हीएनआयटी लवकरच ‘इस्त्रो सेंटर ऑफ इनोव्हेशन’ आणि ‘सेंटर ऑफ एक्सलेंस’चा शुभारंभ करीत असून विद्यार्थ्यांना, नव संशोधकांना येथे हवे ते मार्गदर्शन मिळेल, अशी माहितीही त्यांनी दिली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.

फेब्रुवारी महिन्यात आयोजित ‘हॅकॅथॉन’ ज्यांच्यासाठी टर्निंग प्वाईंट ठरला, ज्यांनी सादर केलेल्या संकल्पनांना बूस्ट मिळाला आणि आज ते यशस्वी उद्योजक म्हणून वाटचाल करीत आहेत असे मुकुंद पात्रीकर आणि हृषिकेश लांडगे यांनीही आपले अनुभव मांडले. हॅकॉथॉनमुळे आज हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

 

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Top Courses and Career Options after 12th Science 2024

Choosing the right career path after completing 12th grade...

The Innovation Hub: Exploring the Top Tech Companies in Seattle that are Revolutionizing

The Innovation Hub: Exploring the Top Tech Companies that...

IPL 2024: Full Schedule,Teams, Players List, Time Table, Venues.

The Indian Premier League (IPL) 2024 is set to...

Happy Holi 2024 Wishes, Whastapp Status, Quotes-Hindi,English

Holi, a highly anticipated and joyous festival of the...