हे काय ! आता पोलीसांचेच घर सुरक्षित नाही ; अधिकाऱ्याच्या घरी तीन लाखाची चोरी

नागपूर : शहरात सक्रिय असलेल्या चोरांनी पोलीस अधिकाऱ्याच्याच घरी हात साफ केला. राजुरा येथील उपविभागीय अधिकारी राजा पवार यांच्या कुशीनगर येथील राहत्या घरून चोरट्यांनी रोख रकमेसह तीन लाखाचा माल चोरून नेला. या घटनेमुळे जरीपटका पोलिसात खळबळ उडाली आहे.

राजा पवार यांची अलीकडेच पदोन्नती होऊन त्यांची राजुरा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली. तेव्हापासून पवार हे परिवारासह राजुरा येथे राहतात. त्यांचे वडील ८२ वर्षीय शेरासिंह पवार हे नागसेननगर येथे राहतात. ते सकाळी व सायंकाळी राजा पवार यांच्या कुशीनगर येथील घराची पाहणी करण्यासाठी येतात. मंगळवारी रात्री चोरांनी घराचे कुलूप तोडून आलमारीत ठेवलेले २० हजार रुपये व दागिने असा एकूण ३ लाखाचा माल चोरून नेला. बुधवारी सकाळी पवार यांचे वडील घरी आले तेव्हा त्यांना चोरी झाल्याचे समजले. पोलीस अधिकाऱ्याच्याच घरी चोरी झाल्याने जरीपटका पोलिसात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. याचप्रकारे उप्पलवाडी येथील दुष्यंत राय मंगळवारी दुपारी बाहेर गेले होते. दरम्यान, चोरांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आलमारीतील १५ हजार रुपयासह १.७५ लाखाचे दागिने चोरून नेले.