नागपूर : ‘यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईकडून दोनदा झालेला आमचा पराभव हा भूतकाळ आहे. त्याचा आजच्या सामन्यावर काहीही फरक पडणार नाही,’ असा विश्वास चेन्नई सुपर किंग्जचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग यानं व्यक्त केला आहे.
मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आज आयपीएलमधील ‘क्वालिफायर १’ सामना होत आहे. आजच्या सामन्यात जिंकणारा संघ थेट अंतिम सामन्यासाठी पात्र ठरणार आहे. त्यामुळं या सामन्याकडं क्रिकेटप्रेमींचे डोळे लागले आहेत. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी जय्यत तयारी केली आहे. यापूर्वी मुंबई संघाकडून खेळणारा हरभजन आता चेन्नईकडून खेळतो आहे. त्यानं चेन्नईच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
यंदाच्या आयपीएलमधील प्राथमिक फेऱ्यांमध्ये चेन्नईला मुंबईकडून दोनदा पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळं मुंबईला जास्त संधी असल्याचं बोललं जातं. मात्र, हरभजननं हा तर्क खोडून काढला आहे. त्यासाठी त्यानं २०१३चा दाखला दिला आहे. ‘२०१३ साली झालेल्या स्पर्धेत आजच्या सारखीच परिस्थिती होती. तेव्हा चेन्नईनं प्राथमिक फेऱ्यांमध्ये मुंबईचा दोनदा पराभव केला होता. मात्र, फायनल मुंबई जिंकली. त्यामुळं यंदाच्या मोसमातले मुंबईचे दोन विजय हा आमच्यासाठी भूतकाळ आहे. त्याचा आम्ही विचारही करत नाही,’ असं तो म्हणाला.
अर्थात, गाफील राहून चालणार नसल्याचं तो म्हणाला. ‘चेन्नई घरच्या मैदानावर खेळते आहे. त्यामुळं फायदा होईल. मात्र, केवळ बाह्य गोष्टींच्या पाठिंब्यावर कुठलाही संघ जिंकत नाही. चांगला खेळणारा संघच जिंकतो. आम्ही चिन्नास्वामी स्टेडियमवर सहा सामने जिंकलो असलो तरी मुंबईनं आम्हाला इथंच मात दिली आहे. त्यामुळं परिस्थितीचा लाभ होईलच, असं म्हणता येणार नसल्याचं त्यानं सांगितलं.
अधिक वाचा : उपराजधानीत चोरट्यांचा हैदोस