नागपूर : कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नवरात्रोत्सव गरब्याविनाच साजरा होणार, अशी लक्षणे दिसत आहेत. त्याच अनुषंगाने शहरातील सर्व देवालयांमध्ये तयारी सुरू असून, महापालिकेकडून जारी होणाऱ्या निर्देशिकांची वाट बघितली जात आहे.
ज्या प्रमाणे महाराष्ट्रात श्रीगणेशोत्सवाचा जल्लोष असतो, त्याचप्रमाणे नवरात्रोत्सवाचा ज्वर असतो. नागपुरातही हा उत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मात्र, यंदा कोरोना संसर्गाची धास्ती वाढल्याने या उत्सवावरही गंडांतर आले आहे. अद्यापही देवालये कुलूपबंदच आहेत. विशेष म्हणजे, नवरात्रोत्सव हा अनेकांगाने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणारा उत्सव असतो. त्यात नऊ दिवस ढोल-ताशे-नगारे, संदल, डीजे यांचा समावेश होत असतो. त्यात बऱ्यापैकी पुढच्या दोन ते तीन महिन्याचे आर्थिक गणित जुळविले जातात. मात्र, यंदा तशी स्थिती नाहीच.
डेकोरेशनशिवाय नवरात्रोत्सवाचा विचारच केला जात नाही. मंदिरांची सजावट, विस्तृत असे शामियाने, रात्रीला जगमगणारे प्रकाशदिवे यंदा नसणार आहेत. श्रीगणेशोत्सवात डेकोरेशनला यंदा वावच मिळाला नसल्याने, या व्यवसायावर निर्भर असणाऱ्यांनाची मोठ्या प्रमाणात आर्थिक गोची झाली होती. त्यांना नवरात्रोत्सवात काम मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तीही फोल ठरत आहे.
त्यातच दररोज मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बेल, फूल, दुर्वा आणि पूजासाहित्य पुरविणाºयांनाही विनाकाम बसावे लागणार आहे. अद्याप देवालयेच सुरू करण्याची परवानगी नसल्याने नवरात्रोत्सवात भाविक देवळांमध्ये येतील तरच नवल. कारण, देवळांमध्ये गर्दी होताना दिसली तर त्यांच्यावर कारवाईचे भय असणार आहे. त्याचा परिणाम हार-फुले विक्रेत्यांच्या उदरनिर्वाहावर झाला आहे. शिवाय, नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देवळांची रंगरंगोटी केली जाते. मात्र, रोजगार कपातीच्या काळात भाविकांकडून तितकीशी वर्गणी गोळा होईल, याची शाश्वती राहिली नाही. त्याचा परिणाम रंगरंगोटी करणाऱ्या कारागिरांच्या रोजीरोटीवर होणार आहे.
घटस्थापनेची तयारी
यंदा नवरात्रोत्सव मोठ्या स्वरूपात साजरा होणार नसला तरी परंपरागत घटस्थापना नक्कीच होणार आहे. मात्र, महापालिकेकडून अद्याप यासंदर्भात कोणत्याही मार्गदर्शिका जाहीर झालेल्या नाहीत. तरी देखील देवळांमध्ये होणाऱ्या सामूहिक घटस्थापनेची तयारी सुरू झालेली आहे. किमान परंपरेला बगल नको म्हणून महापालिकेला घटस्थापनेची परवानगी दिली जावी, अशी विनवणी केली जात आहे.
कोरोना संक्रमणाच्या वेगाचा विचार करता यंदाचा नवरात्रोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. त्याच अनुषंगाने नवरात्रातील अत्यंत महत्त्वाचा विषय असलेला गरबा नृत्य आयोजन रद्द करत आहोत. मात्र, घटस्थापनेची तयारी सुरू आहे. त्यासाठी पोलीस ठाण्यात परवानगीसाठी जाणार आहोत.
राजू अडकिणे, अध्यक्ष – जय शीतला माता मंदिर पंचकमिटी, गोपाळकृष्णनगर.