नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पदव्युत्तर कोर्सला स्वयमच्या मार्फत ऑनलाइन कोर्सचे २० टक्के क्रेडिट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विविध ऑनलाइन कोर्सेस तयार केले आहेत. त्यानुसार पदव्युत्तर कोर्सच्या विद्यार्थ्यांना हे ऑनलाइन कोर्स उपलब्ध करून देण्याचा निर्णय नागपूर विद्यापीठाने घेतला आहे. त्यासाठी प्र कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. समितीच्या बैठकीत स्वयंचे विविध विषय लागू करण्यावर चर्चा करण्यात आली. प्रात्याक्षिक असलेल्या विषयासाठी विद्यार्थ्यांना संबंधीत कॉलेजमध्ये जावे लागेल. परंतु, इतर विषय त्यांना ऑनलाइनच शिकावे लागणार आहेत. त्या विषयांची परीक्षा देखील यूजीसीमार्फत ऑनलाइन घेण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्याचे पाच क्रेडिट त्यांना प्रती सेमिस्टर दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्याशाखेशिवाय अन्य विषय निवडण्याची मुभा देण्यात येणार आहे. तसेच स्वयमचे २० टक्के क्रेडिट कसे लागू करावेत, त्यासाठी विविध अभ्यास मंडळांची बैठक घेण्यात येणार आहे. पदव्युत्तरच्या प्रत्येक सेमिस्टरमध्ये स्वयमचा एक विषय राहणार आहे. त्या विषयाच्या निवडीचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरही स्वयमच्या कोर्सचा विशेष उल्लेख राहणार आहे. बहुतांश विषय हे कौशल्य विकासावर आधारित आहेत.
अधिक वाचा : सीए परीक्षा नव्या पद्धतीनं होणार ; ‘हे’ बदलले