नागपूर : नरखेड येथील प्रभाग क्रमांक पाच सहाला जोडणारा रंगारीपुऱ्यातील बंधारापूल तोडण्यावरुन शुक्रवारी तणाव निर्माण झाला. यावेळी संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीनंतर पोलिसांना जमाव पांगविण्यासाठी लाठीमार केला. जमावातील काहींनी नगरपालिका कार्यालय, पोलिसांची वाहने व नगराध्यक्षांच्या घरावरही दगडफेक केली.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलिस कुमक मागविण्यात आली. सायंकाळपर्यंत हा तणाव कायम होता. पोलिस उपाधीक्षक संजय जोगदंड व पोलिस निरिक्षक मल्लीकार्जुन इंगळे यांनी वेळीच कठोर भूमिका घेतले अनर्थ टळला. नरखेडच्या मध्यभागातून मदार नदी वाहते. रंगारीपुरा व कुंभारपेठ येथील नागरिकांना रहदारीच्या सोईकरीता सुमारे २५ वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आला होता.
पूल जुना झाल्याने नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचे भूमिपूजनही झाले. कंत्राटदाराने वेळेत काम सुरू न केल्याने कंत्राट रद्द करण्यात आले. नवीन पुलाचे काम सुरू झाल्यानंतर जुना पूल तोडावा असा ठराव घेण्यात आला.
मात्र शुक्रवारी पहाटे साडेतीनलाच मुख्याधिकारी माधुरी मडावी या स्वतः पोकलॅण्ड यंत्रासह पुलाजवळ दाखल झाल्याने वाद निर्माण झाला. नगरपालिका उपाध्यक्ष अजय बालपांडे, आरपीआयचे राहुल गजबे पूल पाडण्यास विरोध केला. त्यामुळे तणाव आणखी वाढला.
नगरपालिका, पोलिस ठाण्यावर मोर्चा नेण्यात आला. त्यानंतर जमावाने नगराध्यक्ष अभिजित गुप्ता यांच्या घरावर व पोलिस वाहनांवर दगडफेक सुरू केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अखेर पोलिसांनी लाठीमार करावा लागला.
अधिक वाचा : नागपूर : गुन्हेगार तडीपार असताना घरफोड्या