नागपूर : झाशी राणी चौकातील विदर्भ मराठी साहित्य संकुलातील ट्रिग फोर्स गार्ड कंपनीला कर्मचाऱ्यांनीच ८५ लाख ७३ हजार रुपयांनी गंडा घालण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. विनोद दत्तू कान्होलकर (वय ३४,रा. जयताळा)यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी चार कर्मचाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गौतम सनकाळे (वय ३८,रा. जयताळा), योगेश चवलढाल (वय ४२,रा. अंबाझरी ले-आऊट), गजानन अंजनवाड (वय ३४,रा. नांदेड) व रविकुमार गंजीराला (वय ३४), अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ३० मे २०१५ ते २५ जून २०१८ या कालावधीत चार कर्मचाऱ्यांनी या रकमेची अफरातफर केली.
चौघांनी एलव्हीटीपी, इन्फ्रा आयरन व परमानंद ट्रेडर्स कंपनीमध्ये १३५५ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आल्याचे बनावट दस्तऐवज तयार केले. प्रत्यक्षात मात्र या कंपन्यांमध्ये सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले नव्हते. तीन वर्षांपर्यंत चौघांनी बनावट दस्तऐवजाच्या आधारे या सुरक्षा रक्षकांचे वेतन काढले. हे वेतन बँकेत काढण्यात आलेल्या बोगस नावाच्या खात्यात जमा केले. त्यानंतर चौघांनी ही रक्कम स्वत:च्या खात्यात वळती केली. तीन वर्षांत चौघांनी ८५ लाख ७३ हजार रुपये स्वत:च्या खात्यात वळते केले. राहणीमान बदलल्याने चौघांवर कंपनीच्या अधिकाऱ्यांना संशय आला. त्यांनी कंपनीत तैनात सुरक्षा रक्षकांबाबत माहिती काढली. या कंपन्यांमध्ये सुरक्षा रक्षक तैनात नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली. सीताबर्डी पोलिसचे स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चव्हाण यांनी चौघांविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
अधिक वाचा : नागपुरात व्हाट्सअॅपच्या माध्यमातून ‘आपली बस’ कर्मचाऱ्यांचा तिकीट घोटाळा