ट्रॅक्टर चालणार बायो इंधनावर – नितीन गडकरी

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी Nagpur नागपूर

नागपूर : तणसापासून बायो इथेनॉल प्रकल्प सुरू करण्यासाठी केंद्राने यापूर्वीच पाठपुरावा केला आहे. सद्यस्थितीत देशात ११ ठिकाणी बायो-ईथेनॉल प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन आहे. विचाराधीन प्रकल्प पूर्णत्वाला गेल्यास शेतकऱ्यांद्वारे फेकून देण्यात येणाऱ्या तणसापासून निर्मित बायो इंधनावर ट्रॅक्टर चालेल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

अॅग्रोव्हिजनच्या दहाव्या सत्राचा शुभारंभ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, बिहारचे कृषिमंत्री प्रेमकुमार, खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे, खासदार कृपाल तुमाने, रवी बोरटकर आदी उपस्थित होते.

बायो-इंधनावर अधिक बोलताना गडकरी म्हणाले, ‘इथेनॉलमुळे शेतकरी आणि वाहनचालक दोघांनाही लाभ होणार आहे. इथेनॉलची किंमत प्रतिलिटर ५० रुपये आहे. पेट्रोलच्या तुलनेत दर कमी असल्यामुळे वाहनचालक फायद्यात राहतील तसेच इथेनॉल हे शेतीतील टाकावू घटकांपासून बनणार असल्यामुळे त्याचा नफा शेतकऱ्यांना मिळेल. ऊसाच्या चिपाडापासून तसेच शेतीत वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक घटकापासून बायो-इंधन तयार होऊ शकणार आहे. यामुळे हवाई वाहतूक स्वस्त होणार आहे. तणसाप्रमाणेच बांबूपासून तेलनिर्मिती करण्यावर संशोधन सुरू आहे. संशोधन यशस्वी झाल्यास तेलावर खर्च होणारा पैसा मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे. लवकरच २५ कोटी रुपये खर्च करून शेतकऱ्यांसाठी रिसर्च सेंटर उभे करण्यात येणार आहेत. ज्या दिवशी विदर्भातील शेतकरी आत्महत्या थांबतील त्यादिवशी खऱ्या अर्थाने अॅग्रोव्हिजनचे मिशन पूर्ण होईल.’

केवळ चार वर्षांत २१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी तर २७ हजार कोटी रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी असून चोवीस तास वीज उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच जलयुक्त शिवारमुळे तब्बल सोळा हजार गावातील शेतकऱ्यांना लाभ झाल्याचा उल्लेख त्यांनी केला.

अधिक वाचा : कचरा विलगीकरण करण्याबाबत जनजागृती : नागरिकांनी घेतली स्वच्छतेची शपथ