नागपूर : गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्याने भूगर्भातील जलसाठा कमी झाला आहे. त्यामुळे यंदा पाण्याचे दुर्भिक्ष्य अधिक जाणवणार आहे, किंबहुना ते आत्ताच जाणवू लागले आहे. नागपूर शहराच्या आसपास असलेली गावे आणि वस्त्यांमधील पाणीटंचाई लक्षात घेता, जिल्हा परिषदेने आत्तापर्यंत एकूण १९ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. या १९ गावांत दिवसभरात एकूण २४ टँकर्स पुरविले जात आहेत. याखेरीज अन्य गावांमधूनही पाणीपुरवठ्यासाठी टँकरची मागणी होत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट गावांमध्ये पाणीपुरवठा करावा लागणार असल्याचा अंदाज पाणीपुरवठा विभागातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.
यंदा पाणीटंचाईचे आव्हान मोठे आहे. मुळातच कंत्राटदार आणि निविदा प्रकरणांमध्ये बोअरवेलची प्रक्रिया रखडली. त्यात पदाधिकारी लोकसभा निवडणुकांमध्ये व्यस्त झाल्याने बोअरवेलची कामे सुरू होण्यास उशीर लागला. गेल्या आठवड्यात बोअरवेलची कामे सुरू झाली असून, आतापर्यंत ३० गावांमधील कामे पूर्ण झाल्याची माहिती आहे. मात्र, यंदाच्या पाणीटंचाई आराखड्यात जिल्ह्यातील ४९० गावांमध्ये ८९२ बोअरवेल बसविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे हे आव्हान पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण १९ गावांमध्ये आत्तापर्यंत जिल्हा परिषदेतर्फे टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. यात बिडगाव, लावा, सुराबर्डी, बोथली, खापा निपाणी, मोहगाव ढोले, गिदमगड, गोठणगाव, सुकळी कलार, वलनी, मौराळा, सिताखैरी, नीलडोह, कवडस, तांडा, खापरी रेल्वे, गोटाड पांजरी, पिल्कापार आणि व्याहाड या गावांचा समावेश आहे. यातील बहुतांश गावे शहरालगतची आहेत, हे विशेष. कामठी तालुक्यातील बिडगाव वगळता अन्य सगळी गावे ही हिंगणा आणि नागपूर ग्रामीण तालुक्यातील आहेत. या १९ गावांमध्ये २४ टँकरर्सद्वारे पाणी पुरवठा होत आहे. यात नीलडोह येथे सर्वाधिक ७८ फेऱ्या होत आहेत. गतवर्षी जिल्ह्यातील ३५ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. परंतु, यंदा पाणीटंचाई अधिक जाणवणार असल्याची पूर्ण कल्पना जिल्हा परिषद प्रशासनाला आहे. यंदा ६८ गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
३० गावांत बोअरवेलची कामे
पाणीटंचाईची कामे यंदा विलंबाने सुरू झाली आहेत. अद्याप या कामांना म्हणावी तशी गती प्राप्त झालेली नसल्याची ओरड ग्रामीण भागातून होत आहे. यंदा पाणीटंचाई कृती आराखड्यात जिल्ह्यातील ४९० गावांमध्ये ८१२ बोअरवेल तयार करण्याचा प्रस्ताव होता. तीन टप्प्यांमध्ये बोअरवेलची कामे होणार होती. पहिल्या टप्प्यामध्ये ११३ गावांत १७३ बोअर, दुसऱ्या टप्प्यात ३०६ गावांत ५२० व तिसऱ्या टप्प्यात ७१ गावांत ११९ बोअर होणार होते. परंतु, पहिल्या दोन्ही टप्प्यांत कंत्राटदारांनी सहकार्य न केल्यामुळे बोअरवेलची कामे सुरू होण्यास विलंब झाला. टंचाईच्या कामासाठी पाणीपुरवठा विभागाला सहाव्यांदा निविदा काढावी लागली. अखेर सहाव्या निविदेत पाच कंत्राटदारांनी निविदा भरल्या आणि हे काम सुरू झाले. या कामांना सुरुवात झाली असून, हिंगणा तालुक्यात चौदा ठिकाणी बोअरवेलचे काम पूर्ण झाले आहे. सावनेर येथील चार ठिकाणी हे काम सुरू आहे. या आठवड्यात मौदा तालुक्यातील कामे सुरू झाली आहेत, अशी माहिती प्राप्त झाली. आतापर्यंत एकूण ३० गावांमधील कामे पूर्ण झाली आहे. मात्र, अद्याप ही कामे संथगतीने सुरू असून, ती युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी ग्रामीण भागातील जनता करीत आहे. एप्रिल महिना निम्मा उलटल्यानंतरही अनेक ठिकाणी बोअरवेलची कामे सुरू झालेली नाहीत. गेल्या आठवड्यातच ही कामे सुरू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे यंदा एप्रिल महिन्यातच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे.
दहा टक्के गावांत उपाययोजना
पाणीटंचाई कृती आराखड्यांतर्गत जिल्ह्यातील एकूण १२८४ गावांमध्ये विविध उपाययोजना आखल्या आहेत. यात विंधन विहीर, विहीर खोलीकरण, मळ काढणे इत्यादी कामांचा समावेश आहे. आतापर्यंत केवळ १३० गावांमध्ये या उपाययोजना पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजेच केवळ दहा टक्के गावांत या उपाययोजना झाल्या आहेत.
अधिक वाचा : 215 killed in 8 blasts in Lanka