नागपूर : बॉलिवुडची गुणी अभिनेत्री फरीदा जलाल यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन लहानपणीचे या सिनेक्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगणारी नयना गाडे हॉलिवुडची असोसिएट प्रोड्युसर आणि क्रियेटिव्ह डायरेक्टर बनली आहे. अवघ्या पंचेविशीत नयनाने मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नयनाचे शिक्षण नागपूर व अमरावतीत झाले आहे. लहानपणी बॉलिवुड अभिनेत्री फरीदा जलाल यांचा जादुई अभिनय ‘शरारत’या मालिकेत तिने पाहिला. तेव्हापासून तिने बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगले. अमरावतीतून बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिने मुंबई गाठले आणि तेथे बॅचलर ऑफ मास मीडियाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. या अभ्यासक्रमातूनच ती नाटक व फिल्म मेकिंगचे तंत्र शिकली. अंतिम वर्षात असताना तिने नाटक व लघुपटाची निर्मितीही केली. नयना म्हणते, ‘यादरम्यान मला नाट्य व सिनेसृष्टीतील अनेक तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन मिळाले. त्यातूनच बीबीसीच्या ‘व्हॉट नॉट टू विअर’ या शोमध्ये सहायक निर्माती म्हणून काम करण्याची पहिली संधी मिळाली.’
नयनाचे प्रामाणिक प्रयत्न, कष्ट करण्याची तयारी, नवीन बाबी शिकण्याची तळमळ व चिकाटी तिला ‘नच बलिये’, ‘झलक दिखलाजा’ या रिअॅलिटी शोच्या पोस्ट प्रॉडक्शन टीममध्ये स्थान मिळवून गेली. या दोन्ही मालिकांची ती सहायक निर्माती होती. या क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान मिळविण्याच्या प्रखर इच्छेने तिला हॉलिवुडपर्यंत पोहोचवले. न्यूयॉर्क फिल्म अॅकॅडमी या जगप्रसिद्ध फिल्म प्रोड्युसिंग इन्स्टिट्यूटमध्ये तिने ‘मास्टर ऑफ फाइन आर्ट्स इन प्रोड्यूसिंग प्रोग्रॅम’ हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तेथे तिने ‘शुगर’ या सिनेमासाठी एक्झिक्यूटिव्ह प्रोड्यूसर म्हणून काम केले. ‘दे केम अॅज स्लेव्हज’या टीव्ही मालिका आणि ‘ स्नॅप्ड’ या चित्रपटाची प्रोड्यूसर, रायटर आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून ती का काम करते आहे.
‘कोशिक करने वालो की हार नहीं होती’
नयना सिनेक्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना सांगते, ‘कुशल माणसांची या इंडस्ट्रिला सतत गरज असते. त्या संधीचे सोने करणारी, तांत्रिक क्षमता, चिकाटी असणारी माणसे येथे टिकतात. सिनेमा तयार करण्यासोबतच त्याची जाहिरात करणे, समीक्षण, प्रमोटर्स शोधणे, मार्केटिंग करणे याबाबीही महत्त्वाच्या असतात. त्यामुळे युवकांना जर या क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर त्यांना आवडणाऱ्या घटकांचा सखोल अभ्यास करावा. इंडस्ट्रिची दारे त्यांच्यासाठी कायम खुली आहेत.’
अधिक वाचा : नागपूर – शरीराचे तुकडे करून खून