टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पुरुष हॉकी संघाने इतिहास रचला. भारतीय हॉकी संघाने जर्मनीचा ५-४ असा पराभव करत कांस्यपदक जिंकले. १९८० नंतर पहिल्यांदाच म्हणजेच तब्बल ४१ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने पदक मिळवले आहे.
जर्मनीने पहिल्या १५ मिनिटांच्या क्वार्टरमध्ये जर्मनीने १-० अशी आघाडी घेत भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या क्वार्टरमध्ये जर्मनीला अनेक पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण भारताने त्यांना दुसरा गोल करण्याची संधी दिली नाही.
भारताने दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला गोल करत बरोबरी साधली. भारताकडून पहिला गोल सिमरनजीतने केला. पण जर्मनीने पुन्हा वापसी करत २-१ अशी आघाडी घेतली. जर्मनीने दुसरा क्वार्टर संपण्यास सहा मिनिटे शिल्लक असताना गोल केला.
जर्मनीने पुन्हा भारताचा बचाव भेदत तिसरा गोल केला. त्यानंतर भारताकडून हार्दिक सिंह आणि हरमनप्रीत सिंगने गोल करत जर्मनी विरुद्ध ३-३ अशी बरोबरी साधली. दोघांनी हे गोल पेनल्टी कॉर्नरच्या मदतीने केले.
तिसरा क्वार्टर सुरु झाल्यानंतर तिसऱ्या मिनिटाला रुपिंदर पाल सिंहने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करत भारताला ४-३ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सिमरनजीतने पाचवा गोल करत जर्मनीवर दबाव निर्माण केला.
चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीला जर्मनीने पेनल्टी कॉर्नर मिळवत चौथा गोल केला. सामना संपेपर्यंत ५-४ अशी आघाडी कायम राहिल्याने भारताने विजयाचे स्वप्न साकार केले.
दरम्यान, बेल्जियमने याआधीच्या सामन्यात भारतावर ५-२ गोलने विजय मिळवला होता. त्यामुळे ऑलिम्पिमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचं भारतीय संघाचं स्वप्न धुळीस मिळालं होतं.
पूल सामन्यात भारताला पराभूत करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने जर्मनीला ३-१ गोलफरकाने पराभूत करत अंतिम फेरीत गाठली आहे.
जर्मनीचा बचाव भेदला…
त्यामुळे भारताला कांस्य पदकाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाऐवजी रिओ ऑलिम्पिक-२०१६ च्या कांस्यपदक विजेत्या जर्मनीशी सामना करावा लागला. मात्र, भारताने चांगला खेळ करत जर्मनीला मात दिली.
२०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये पूल टप्प्यात बेल्जियमने भारतीय हॉकी संघाचा ३-० असा पराभव केला होता. तर २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये, उपांत्यपूर्व फेरीत भारताला ३-१ ने पराभूत व्हावे लागले होते.
अशा परिस्थितीत भारताने फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, बेल्जियमने त्यांना पराभूत केलं होतं. पण कांस्यपदकाच्या लढतीत भारताने जर्मनीचा पराभव केला.