नागपूर : शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या व होणारे मृत्यू लक्षात घेता शहरातील ४२ खासगी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांचे उपचार सुरू आहेत. पुन्हा संख्या वाढवली जात आहे. सोबतच खासगी रुग्णालयांकडून काढण्यात येणाऱ्या बिलाचे ऑडिट केले जात असल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला आहे. दुसरीकडे आधी पैसे जमा करा नंतर उपचार अशी भूमिका खासगी हॉस्पिटलने घेतली आहे. अशा परिस्थितीत दीड-दोन लाख रुपये जमा करणे शक्य नसलेल्या गरीब कोविड रुग्णांनी उपचार कुठे घ्यायचे, असा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.
कोविड रुग्णांसाठी बेडची संख्या २ हजारापर्यंत वाढवल्याचा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे उपचारासाठी रुग्णांची भटकंती थांबलेली नाही. शासकीय रुग्णालयात जागा नाही. खासगी रुग्णालयात दाखल करून घेतले जात नाही. मनपाच्या नियंत्रण कक्षाकडे विचारणा करण्याचा प्रयत्न केला तर वेळेवर फोन लागत नाही. लागला तरी उपचार मिळेलच याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत दोन-अडीच लाख खर्च करण्याची कुवत नसलेल्यांनी उपचार कुठे घ्यावे, असा गंभीर प्रश्न पडला आहे.
उपचारावरील खर्चाचा बोर्ड लावावा
खासगी रुग्णालयांनी दर्शनी भागात कोविड रुग्णांच्या माहितीसाठी उपचारासाठी येणाऱ्या खर्चाची माहिती असलेला बोर्ड लावावा. तसेच कोविड रुग्णांसाठी असलेले बेड, उपचार सुरू असलेले रुग्ण, रिक्त बेड, उपचार करणाऱ्या डॉक्टरांची माहिती द्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
अधिकारी खासगी रुग्णालयात भरती
कोरोनाबाधितांवर वेळेत उपचार करता यावेत, यासाठी मेडिकल आणि मेयो येथे अतिरिक्त खाटांची व्यवस्थाही करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. विविध यंत्रणांनी सज्ज असल्याचे वेळोवेळी सादरीकरण केले. मात्र यंत्रणा सज्ज असल्याचे सांगणारे अनेक अधिकारी खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
नियंत्रणाची गरज
मनपाची चार रुग्णालये सुसज्ज करण्यात आली. येथे कोविड रुग्णांवर उपचार होणे अपेक्षित होते. मात्र इंदिरा गांधी रुग्णालय वगळता अन्य ठिकाणी उपचार सुरू झालेले नाही. इंदिरा गांधी रुग्णालयातही मनुष्यबळाची समस्या आहे. दुसरीकडे खासगी रुग्णालयांवर प्रशासनाचा वचक दिसत नाही. रुग्णांकडून वारेमाप बिल वसुलणाºया रुग्णालयांना नोटीस बजावण्यापलिकडे कारवाई होत नसल्याने त्यांना प्रशासनाचा धाक राहिलेला नाही.