पुणे,
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने अखेर महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचा फॉर्म्युला निश्चित केला असून तो जाहीर करण्यात आला आहे. जून अखेरपर्यंत दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल लावण्यात येणार आहे. दरम्यान इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ऐच्छिक स्वरुपाची सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकताच जाहीर केला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासंदर्भात आणि अकरावीच्या प्रवेशाबद्दलची प्रक्रिया जाहीर केली. दहावीच्या निकालासाठी १०० टक्के गुणांपैकी ५० टक्के गुणांचे वेटेज दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनावर तर ५० टक्के गुणांचे वेटेज नववीच्या अंतिम परीक्षेच्या गुणांना देऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाचा निकाल समाधानकारक न वाटल्यास त्यांना श्रेणी सुधार परीक्षे अंतर्गत दोन संधी देण्यात येणार आहेत.
वर्षा गायकवाड म्हणाल्या, राज्यातील करोना संसर्गामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये आपण वर्षभर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन, ऑफलाइन अध्यापन यासाठी आपण वर्षभर विविध उपक्रम राबवले आहेत. करोना प्रादुर्भावामुळे मार्च-२०२१ पासून इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट असलेले विद्यार्थी, पालक व परीक्षेसंदर्भात काम करणारे घटक या सर्वांचे आरोग्य ही आमची सगळ्यात महत्वाची प्राथमिका आहे, हे आम्ही सातत्याने सांगत आलेलो आहोत. म्हणूनच राज्य शिक्षण मंडळाच्यावतीने आयोजित केलेली इय़त्ता दहावीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील निर्णय आम्ही, राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. त्यानुसार राज्य शासनाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये इयत्ता दहावी वर्षासाठी प्रविष्ट असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे, सरकट उत्तीर्ण करण्यास संदर्भातील परवानगी दिली होती.
विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मुल्यमापन
विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन ३० गुण
विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावीचे गृहपाठ/ तोडीं परीक्षा/ प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन २० गुण
विद्यार्थ्यांचा इयत्ता नववीचा विषय निहाय अंतिम निकाल ५० गुण
या प्रमाणे विषयनिहाय एकूण १०० गुण (इयत्ता नववी संपादणूक यासाठी ५० टक्के भारांश व इयत्ता दहावी संपादणूनक यासाठी ५० टक्के भारांश )
जून २०२१ अखेर निकाल
विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शाळास्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची निकाल समिती असेल, या निकालपत्रांच्या अभिलेखांची पडताळणी विभागीयस्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यंकडून करण्यात येईल. शाळास्तरावर गैरप्रकार अथवा अभिलेख यामध्ये फेरफार झाल्यास शिस्तभंग व दंडात्मक कारवाई याची तरतूद करण्यात आली आहे. मंडळामार्फत जून २०२१ अखेर निकाल घोषित करण्याचे नियोजन आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल. सर्व शाळांनी या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करावे.