मुंबईः हिंदवी स्वराज्याच्या लढ्यातील ‘सिंह’ नरवीर तानाजी मालुसरे यांचा पराक्रम सांगणारा ‘तानाजीः द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं आहे. चित्रपटात अभिनेता अजय देवगण तानाजींच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, ओम राऊतनं या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचं आव्हान पेललं आहे.
अभिनेत्री काजोलनं ‘तलवारीइतकीच तीक्ष्ण बुद्धिमत्ता’ असं कॅप्शन देत या चित्रपटाचं पोस्टर ट्विटरवर शेअर केलं आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच रसिकांच्या मनात चित्रपटाबाबत उत्सुकता होती. अजय देवगणबरोबरच अभिनेता सैफ अली खान चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सैफ उदयभान राठोड यांची भूमिका साकारणार आहे. सैफच्या चित्रपटातील लूकचंही पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये सैफच्या भूमिकेची एक झलक पाहायला मिळतेय. मराठमोळा अभिनेता अजिंक्य देव हा सुद्धा चित्रपटात झळकणार आहे. मात्र, त्याची भूमिका कोणती हे मात्र गुलदस्त्यात आहे.
चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी, शिवाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका काजोल साकारणार असल्याची चर्चा आहे. १० जानेवारी २०२०ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
कोंढाणा किल्ला सर करण्याची जबाबदारी महाराजांनी आपल्यावर सोपवल्याचं कळताच, मुलाचं लग्न बाजूला ठेवून तानाजी मालुसरे सज्ज झाले होते. ‘आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं’ अशी गर्जना करत ते मोहीम फत्ते करण्यासाठी गेले होते. त्याच्या अतुलनीय पराक्रमामुळे मावळ्यांनी किल्ला जिंकलासुद्धा; पण शत्रूशी बेभान होऊन लढताना हा सिंह धारातीर्थी पडला होता. त्यांच्याच स्मृतिप्रित्यर्थ कोंढाणा किल्ल्याचं नाव सिंहगड असं ठेवण्यात आलंय. लढवय्या तानाजींची ही वीरगाथा ७० एमएम पडद्यावर पाहणं हा नक्कीच विलक्षण अनुभव असेल.