नागपूर : गेल्या अनेक वर्षांत बारावीत अव्वल स्थान सायन्स शाखेतील विद्यार्थी वा विद्यार्थिनी मिळवत आले आहे. यंदा मात्र ही परंपरा मोडली, कॉमर्स शाखेतील विद्यार्थिनींनी. विदर्भातून पहिला आणि दुसरा क्रमांक याच शाखेतील विद्यार्थिनींनी पटकाविला आहे. भंडारा येथील नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालयातील खुशी संतोष गंगवानी हिने ९६.४६ टक्के गुणांसह विदर्भातून अव्वल स्थान पटकाविले. नागपूरच्या कौशल्यादेवी माहेश्वरी ज्युनिअर कॉलेजमधील कॉमर्सच्या इशिका नरेश सतीजा हिने ९६.३० गुणांसह दुसरे स्थान पटकाविले आहे. गोंदियातील गुजराती कनिष्ठ महाविद्यालयाची सायन्स शाखेची सिया धनेंद्र ठाकूर हिने ९५.८४ गुण घेत तिसरे स्थान पटकाविले. सिया ही सायन्स शाखेत विदर्भातून पहिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल मंगळवारी जाहीर केला. राज्यातील नऊ विभागांमधून कोकण विभाग ९३.२३ टक्क्यांसह अव्वल स्थानी राहिले. नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी ८२.५१ टक्के लागला. गेल्यावर्षीपेक्षा हा निकाल ५.०६ टक्क्यांनी कमी आहे. ८७.८८ टक्के उत्तीर्णांसह पुणे विभागाने दुसरा क्रमांक तर अमरावती विभागाने ८७.५५ टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. विदर्भातील जिल्ह्यांचा विचार करता ९१.५५ टक्के निकाल देत वाशीमने बाजी मारली आहे. ८७.९९ टक्क्यांसह गोंदिया जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे. गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांत कमी म्हणजे ६८.८० टक्के निकाल लागला. यावेळी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ८५.८८ टक्के असून, गेल्या पाच वर्षांतील हे नीचांकी प्रमाण आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तीर्णांचे प्रमाणही २.५३ टक्क्यांनी कमी झाले आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्याचा निकाल २.५३ टक्क्यांनी घसरला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ८५.८८ टक्के आहे. राज्यातील तब्बल ४ हजार ४७० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. परिणामी प्रवेशासाठी चढाओढ राहणार आहे. कृतिपत्रिका आणि प्रश्नपत्रिकांच्या आराखड्यामधील बदलामुळे निकाल कमी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. निकालात घसरण होण्यामागे इंग्रजी आणि गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि पदार्थविज्ञान हे विषय कारणीभूत ठरले आहेत. या विषयांत नापास होण्याचे प्रमाण गेल्यावर्षीपेक्षा अधिक आहे. एकूण निकालात मुलींचेच वर्चस्व आहे. मुलींच्या निकालात कोकणने बाजी मारली असून यात सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा आहे.
नागपूर विभागाची घसरण
नागपूर विभागात यंदा १ लाख ५८ हजार ४२७ नियमित विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी १ लाख ५८ हजार ३१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ३० हजार ६३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मागील वर्षी नागपूर विभागातून १ लाख ६४ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातुलनेत यंदा ६ हजार ३०८ विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळेदेखील निकाल घसरला असल्याचा दावा करण्यात येत आहे.
अधिक वाचा : Electricity duty exemption to industries in Vidarbha, Marathwada extended up to 2024