काश्मीर : पुलवामा हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक असणारा जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी सज्जाद भट याला सुरक्षादलाने आज सकाळी अनंतनाग येथे कंठस्नान घातलं. त्याच्या एका सहकाऱ्याचाही खात्मा करण्यात आला असून या चकमकीत सैन्यदलातील एक जवानही शहीद झाला आहे.
१४ फेब्रुवारीला पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर २०० हून अधिक स्फोटकांनी भरलेल्या एसयुव्ही गाडीने हल्ला केला होता. सीआरपीएफचे ४८ जवान या हल्ल्यात शहीद झाले होते. या हल्ल्यात वापरलेली गेलेली एसयुव्ही सज्जाद भट नावाच्या तरुणाची असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं. पुलवामा हल्ल्याचं प्लॅनिंगही भटनेच केलं होतं.
गेल्या तीन महिन्यांपासून सुरक्षा दल भटचा शोध घेत होते. सोमवारी संध्याकाळी भट अनंतनाग जवळीत बिजबेहरा येथील एका इमारतीत लपला असल्याची माहिती गुप्तहेर यंत्रणांनी दिली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने सज्जाद भट लपला असलेल्या इमारतीला घेरलं. इमारतीत लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू करताच सुरक्षा दलाने त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. काही तासांतच सज्जाद भट आणि त्याच्या एका सहकाऱ्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आलं.
या चकमकीत एक जवानही शहीद झाला आहे. या इमारतीत अजूनही काही दहशतवादी लपले असून सुरक्षा दलांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. भट आणि त्याच्या सहकाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.
अधिक वाचा : Students fail to get link; Engg admission process crashes on first day