नागपूर : म्हातारपणी तुम्ही कसे दिसाल, हे दर्शविणारे एक अॅप गुरुवारी सोशल मीडियावरून व्हायरल झाले आणि बघता बघता तरुणाईला त्याने चांगलीच भुरळ घातली.
फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून बॉलिवूडच्या काही सेलिब्रिटींनी आपला भविष्यातील ‘ओल्डएज लूक’ अपडेट केला. गुरुवारी सकाळी हे फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर तासाभरातच हा ‘ट्रेण्ड’ सर्वत्र पसरला आणि अनेकांनी गूगल प्ले-स्टोअरवरून म्हातारपणात तुम्ही कसे दिसाल, हे दर्शविणारे संबंधित अॅप डाउनलोड करण्यास वेगाने सुरुवात केली. बघता बघता कॉलेजकट्ट्यावर या अॅपच्या फोटोंचे लोण पसरले.
अनेकांनी आपापल्या मित्र-मैत्रिणींचे फोटो अपलोड करीत ते म्हातारपणी कसे दिसतील, याचा ‘लूक’ व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल केला. काहींनी आपापल्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप स्टेटसवरही हे फोटो ठेवले होते. दिवसभर फोटो शेअरिंगचा हा प्रकार सुरू होता. दुपारनंतर काही जणांच्या मोबाइलमध्ये या अॅपने काम करणे आपोआपच बंद केले. त्यामुळे सकाळी डाउनलोड झालेले हे अॅप अनेकांनी सायंकाळी डिलीटही केले.
सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
म्हातारपणात तुम्ही कसे दिसाल, हे दाखविणारे अनेक अॅप गूगल प्ले-स्टोअरवर उपलब्ध आहेत. परंतु, ते डाउनलोड केल्यानंतर फोटो अपलोड करताना संबंधित अॅपला गॅलरी आणि फोनमधील डाटा वापरण्याबाबत परवानगी द्यावी लागते. त्यामुळे अशा अॅप्समुळे फोनमधील माहिती असुरक्षित हातात जाऊ शकते. यासंदर्भातील संदेशही दिवसभर ‘ट्रेण्डिंग’मध्ये होते.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
भविष्यात तुम्ही कसे दिसाल ते दर्शविणारे अॅप कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ‘आर्टिफिशअल इंटेलिजन्स’ तंत्रज्ञानाचा वापर करणारे आहे. अशा प्रकारचे बहुतांश अॅप रशियातील कम्प्युटर अभियंत्यांनी तयार केले आहेत. ते वापरण्यापूर्वी कुठल्याही व्यक्तीने त्यांना फोनमधील डाटा वापरण्याची परवानगी दिल्यास फोनमधील संपूर्ण फोटो, व्हिडीओ आणि इतर माहिती संबंधित अॅप तयार करणाऱ्या कंपनीच्या सर्व्हरवर सेव्ह होते. हा डाटा संबंधित कंपनी कोणत्याही कारणासाठी कधीही व कुठेही वापरू शकते व त्यासंदर्भात वापरकर्त्याला कायदेशीर दादही मागता येत नाही, असे अॅपला परवानगी देताना येणाऱ्या संदेशात नमूद असते. परंतु, तो फोनच्या स्क्रीनवर दिसत नाही.
मोहात पडणे टाळा !
गूगल प्ले-स्टोअरवरून कोणतेही अॅप डाउनलोड केल्यानंतर त्याला आपल्या फोनमधील डाटा वापर करण्याची परवानगी देताना खबरदारी घेणे अलीकडच्या काळात नितांत गरजेचे झाले आहे. अन्यथा तुमचा सगळा गोपनीय डाटा, बँकेचे पासवर्ड, फोनचे क्रमांक, यूपीआय पिन, आधारशी संबंधित माहिती चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कितीही मोठा सेलिब्रिटी असे गमतीखातर असुरक्षित अॅप का वापरत असेना, आपण या मोहाला बळी न पडलेलेच बरे, ही खूणगाठ प्रत्येकाने बांधणे गरजेचे असल्याचे सायबरतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अधिक वाचा : Save up to Rs. 46,800 in tax, invest in Tax Saving Funds today