नागपूर : लहानग्यांच्या विश्वात हक्काचे स्थान निर्माण केलेले विमान म्हणजे कायमच उत्सुकतेचा विषय. विमान कसे बनते, इथपासून तर कसे उडतेपर्यंतच्या सर्वच गोष्टी चिमुकल्यांसह मोठ्यानांही भुरळ घालत असतात. विमान आणि त्यासंबंधीची उत्सुकता रविवारी क्षणोक्षणी मानकापुरातील विभागीय क्रीडा संकुलात जाणवली. निमित्त होते एअरोमॉडलर्स असोसिएशन आणि एअरोव्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एअरोमॉडेलिंग शोचे!
‘विमानाचा शोध कुणी लावला,’ असे विचारल्यानंतर राइट बंधू असे नाव आपल्या तोंडावर सहजपणे येते. पण, राइट बंधूच्या संशोधनापूर्वी अस्तित्वात आलेल्या एअरोमॉडेलिंगला अद्याप गांभीर्याने घेण्यात आलेले नाही. लोकांमध्ये एअरोमॉडेलिंग काय आहे, हे समजून घ्यावे, त्याबद्दलची उत्सुकता वाढावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या शोमध्ये देशातील वजनाने सर्वांत हलके तसेच सर्वांत मोठे एअरोमॉडेल उडविण्याचा विक्रम करण्यात आला. शहरातील डॉ. राजेश जोशी यांनी तयार केलेल्या ‘पेनी प्लेन’चे यशस्वी उड्डाण करण्यात आले.
केवळ तीन ग्रॅमचे रबर पॉवर्ड फ्री फ्लाइट एअरो मॉडेल साकारण्यासाठी त्यांनी बालसा लाकडाच्या २ मिमी. अशा अतिशय पातळ काड्यांचा वापर केला आहे तसेच अतिशय पातळ अशा मायलार फिल्मचा पखांच्या कव्हरिंगसाठी वापर केला असून. खास प्रकारचे १.५ मिमी.चे अतिशय लवचिक असे रबरदेखील वापरले आहे. साडेतीन ग्रॅमचा या पेनी प्लेनला कुठलेही इंजिन नसून रबरच्या माध्यमातून ते उडते. त्याचा आकार १८ बाय २० इंच आहे. या एअरोमॉडेलने १.३ मिनिटांचे उड्डाण यशस्वीरित्या केले. याशिवाय गोवा येथून आलेल्या कमांडर (निवृत्त) टी. आर. अनंत नारायणन यांनी तयार केलेल्या पेनी प्लेनने १ मिनिट २९ सेकंदांचे उड्डाण केले.
संपूर्ण शोमध्ये आकर्षणबिंदू ठरला तो रोहित डे या युवकाने बनवलेले सर्वांत मोठ्या आकाराचे एअरोमॉडेल. १.५ मीटर आकार आणि १ किलोग्रॅम वजनाचे एअरोमॉडेल बीएससी अंतिम वर्षाला असलेल्या रोहितने तयार केले आहे. आऊटडोअर स्वरुपाचे हे मॉडेल पहिल्यांदा इनडोअर स्टेडियममध्ये उडविण्यात आले.
एकाच ठिकाणी तीन वेगवेगळ्या प्रकारचे एअरोमॉडेल उडविण्याचा विक्रम यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाला एअरोमॉडेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ओ. डी. शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते. शोला उपस्थित शालेय विद्यार्थ्यांनी एअरोमॉडेलचे तंत्र, प्रकार आदींबाबत माहिती जाणून घेतली.
अधिक वाचा : नागपूरः संघ वर्गाच्या समारोपाला रतन टाटांची हजेरी !