नागपूर : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात घडलेल्या अमानवीय घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेचे पडसाद गुरुवारी नागपुरातही उमटले. विविध पक्षांनी व सामाजिक संघटनांनी या घटनेचा निषेध करीत आरोपींना तातडीने अटक करून फाशीची शिक्षा ठोठावण्याची मागणी केली.
फाशीच्या शिक्षेसाठी राष्ट्रपतींना निवेदन
बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संयोजिका व माजी राज्यमंत्री अॅड. सुलेखा कुंभारे या या घटनेचा निषेध करीत या घटनेतील अरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन सादर केले.
युवा सेनेतर्फे कॅण्डल मार्च
युवा सेनतर्फे जिल्हा सचिव धीरज फंदी यांच्या नेतृत्वात कॅण्डल मार्च काढण्यात आला. यावेळी पीडितेला श्रद्धांजली अर्पण करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या कँडल मार्चमध्ये माजी उपमहापौर किशोर कुमेरिया, संदीप पटेल, शशिकांत ठाकरे, निलेश तिघरे, सलमान खान, सचिन डाखोरे, विक्रम राठोड़, यश जैन, आशिष बोकड़े, बंटी धुर्वे, गौरव गुप्ता, हर्षल सावरकर, आशिष देशमुख, प्रवीण धावड़े, नितीन लोखंडे, कौशिक येलणे, आकाश पांडे, सिद्धू कोमेजवर, शंकर वानखेडे, राजेश बांडेबुचे, सनी अग्रवाल, मनीष साखरकर, शुभम अग्रवाल, पावन सावरकर आदी सहभागी होते.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे गोळीबार चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी मनीषा वाल्मिकीची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. शहर जिल्हाध्यक्ष रवी पराते यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात नुतन रेवतकर, मिलिंद मानापुरे, सौरभ मिश्रा, आशिष आवळे, संजय धापोडकर, संदीप मेंढे, स्वप्नील अहीरकर, राहुल कांबळे, अमित दुबे, शहनवाज खान, आकाश चौधरी आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करा
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच आरोपींना पाठीशी घालणारे योगी सरकार बरखास्त करून राष्ट्रपती शासन लागू करा, अशी मागणी केली.
नागपूर शहर महिला काँग्रेस
नागपूर शहर महिला काँग्रेसतर्फे कॅण्डल मार्च काढून सक्करदरा येथील गांधी पुतळ्याजवळ मृत पीडितेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शहर महिला कॉँग्रेसच्या अध्यक्षा प्रज्ञा बडवाईक, संगीता उपरीकर, अर्चना सिडाम, शालिनी सरोदे, बेबी गाडेकर, भारती कामडी, रेखा काटोले, प्रमिला धने, सुनीता मेहर, ज्योती धाके आदींसह मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.