नागपूर : ताजबाग हे नागपुरातील एक पवित्र धार्मिकस्थळ आहे. ताजबाग येथील ऊर्स हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले. ताजबाग येथे संत ताजुद्दीन बाबाच्या पुण्यतिथीनिमित्त ऊर्सचे आयोजन करण्यात आले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर त्यांच्यासमवेत क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, नगरसेविका स्नेहल बिहारे, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, झोन सहायक आयुक्त राजेश कराडे, मौलाना अब्दुल रशीद, मुफ्ती जामीया अरेबीया, अश्विन नूतन कुमार, प्रशासक गुणवंत कुबडे, माजी नगरसेवक अमनउल्ला खान प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना महापौर म्हणाल्या, ताजबाग हे नागपुरातील पवित्र धार्मिक स्थळ आहे. ताजबागला ऐतिहासिक महत्त्व आहे. संत ताजुद्दीन बाबाच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. या ऊर्ससाठी आलेल्या सर्व भाविकांचे नागपूरची महापौर म्हणून स्वागत करते. या ऊर्स दरम्यान लागणाऱ्या मदतीसाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. काही आवश्यकता पडल्यास महानगरपालिका प्रशासन सर्वतोपरी मदत करेल, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
ऊर्ससाठी महानगरपालिकेने केलेल्या व्यवस्थेची पाहणी यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी केली. भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश महापौरांनी दिले. प्रारंभी ताजबाग येथील ताजुद्दीन बाबाच्या दर्ग्याला महापौर व इतर मान्यवरांनी भेट दिली.
अधिक वाचा :आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची 100 फुटाने कमी केली : आनंदराज आंबेडकर यांचा आरोप