पनवेल : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक असलेले पत्रकार अर्णब गोस्वामी यांना बुधवारी सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला. रात्री ८.१५ वाजता अर्णब तळोजा कारागृहातून बाहेर आले. या वेळी गोस्वामी हे बाहेर पडताच गाडीतूनच ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा देऊ लागले. त्यांच्या समर्थकांनी कारागृह परिसरात मोठी गर्दी केली होती.
‘अर्णब जिंदाबाद’, ‘भारतमाता की जय’ यांसारख्या घोषणा सुरू केल्या होत्या. विशेष म्हणजे कारागृह परिसरात वाढती गर्दी लक्षात घेता पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अर्णबच्या समर्थनार्थ कारागृहासमोरील रस्त्यावर समर्थकांनी ‘हॅपी दिवाली अर्णब’ – ‘सत्यमेव जयते’ अशा आशयाच्या रांगोळ्या काढल्या होत्या. कारागृहातून बाहेर पडणाऱ्या अर्णबचे स्वागत मोबाइल टॉर्च लावून सर्वांनी केले.
अर्णबची रवानगी तळोजा कारागृहात केल्यापासून तळोजा कारागृहाबाहेर अर्णब समर्थक दररोज गर्दी करीत होते. आजदेखील अर्नबच्या जामिनाची माहिती मिळताच कारागृहाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले. कारागृहातून बाहेर आल्यावर मी सुप्रीम कोर्टाचा आभारी आहे, अशी पहिली प्रतिक्रिया गोस्वामी यांनी दिली. कारागृहातून बाहेर आल्यानंतर जमलेल्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात कारागृहाबाहेर वाहतूककोंडी झाल्याचे पाहावयास मिळाले.