नागपूर : प्रशिक्षणादरम्यान दहा वर्षीय विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या कराटे प्रशिक्षकाला मानकापूर पोलिसांनी अटक केली आहे. नीलेश मिश्रा (वय ३५) असे अटकेतील प्रशिक्षकाचे नाव आहे. पीडित मुलीच्या वडिलांचे हॉटेल आहे. नीलेश हा नेहमी हॉटेलमध्ये जेवायला जात होता. त्यामुळे त्याची मुलीच्या वडिलांसोबत ओळख होती.
कराटे प्रशिक्षक असल्याचे त्याने मुलीच्या वडिलांना सांगितले होते. मुलीच्या वडिलांनी नीलेशला मुलीला कराटेचे प्रशिक्षण देण्यासाठी सांगितले. नोव्हेंबर महिन्यापासून नीलेशने हॉटेलमालकाची मुलगी व शेजारी राहणाऱ्या अन्य एका मुलीला कराटेचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. तो मुलींना छतावर प्रशिक्षण देत होता. प्रशिक्षणादरम्यान एकटी पाहून तो मुलीशी अश्लील चाळे करायला लागला.
एक महिन्यापर्यंत त्याने मुलीशी अश्लील चाळे केले. या प्रकाराने मुलगी तणावात राहायला लागली. तिची मानसिक स्थितीही खालावली. तिच्या आईने तिची विचारपूस केली. कराटे प्रशिक्षक अश्लील चाळे करीत असल्याचे तिने आईला सांगितले. मुलीच्या आईला धक्का बसला. तिने पतीला ही बाब सांगितली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी चाइल्डलाइनच्या हेल्पलाइनवर संपर्क साधला व घटनेची माहिती दिली. दोन महिला अधिकारी पीडित मुलीच्या घरी आल्या. त्यांनी तिची चौकशी केली.
त्यानंतर मानकापूर पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. मानकापूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वजीर शेख यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून नीलेशला अटक करण्याचे निर्देश दिले. मानकापूर पोलिसांनी बुधवारी त्याला अटक केली. पोलिस आज, गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी करतील.
अधिक वाचा : ‘लाव रे तो व्हिडिओ’; राज यांच्या ‘पंच’ची चर्चा