पुन्हा सिद्ध करावी लागेल मजबूती

चिंचभवन

नागपूर : वर्धा रोडवर चिंचभवन येथे निर्माणाधीन आरओबीकरिता स्थापन करण्यात आलेल्या गर्डरच्या मजबुतीसाठी दुसऱ्यांदा तपासणी अहवाल व्हीएनआयटीकडे पाठविण्यात आला आहे. पहिला अहवाल गेल्या महिन्यात मंजुरीसाठी रेल्वेला पाठविण्यात आला होता. यात रेल्वे इंजिनिअरिंग विभागातर्फे काही प्रश्न उपस्थित केले होते.

सध्याच्या अप-डाऊन रेल्वे लाईनव्यतिरिक्त निर्माणाधीन पुलाखाली भविष्यात अतिरिक्त रेल्वे रूळ टाकण्याची शक्यता लक्षात घेऊन २२ मीटर दूर अंतरावर आरओबीकरिता पिलर उभा केला आहे. याच कारणाने मध्यभागी सपोर्टकरिता पिलर उभा करण्याची परवानगी मिळाली नाही. दुसरीकडे रेल्वे रुळापासून ३३ मीटर दूर अंतरावर पिलर उभा आहे. अर्थात एकूण ५५ मीटरचा स्टील गर्डर या दोन पिलरशी जुळला आहे. या लांबीत ३३ मीटरचे सहा आणि २२ मीटरच्या सहा गर्डरला मध्यभागी जोडून स्ट्रक्चर तयार केले आहे. लांबी जास्त असल्यानंतरही मध्यभागी सपोर्टकरिता कोणतेही पिलर नाहीत. सध्या येथे अस्थायीरीत्या लोखंडाच्या ढाच्याने सपोर्ट दिला आहे.

पूल तयार झाल्यानंतर एवढ्या लांबीच्या गर्डरवरून जेव्हा अवजड वाहने जातील तेव्हा मधील भाग क्षतिग्रस्त तर होणार नाही ना, अशी भीती रेल्वेला वाटत असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळेच गेल्या महिन्यात थर्ड पार्टी ऑडिटअंतर्गत व्हीएनआयटीची मदत घेण्यात आली. अहवाल प्राप्त झाल्यानंतर रेल्वे झोन मुख्यालयात पाठविण्यात आला. त्यानंतर रेल्वेच्या इंजिनिअर्सनी निर्माणाधीन आरओबीची पाहणी करून काही प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर पुन्हा मजबुतीशी जुळलेले सर्व भाग पाहण्यासाठी जुने अहवाल आणि नवीन प्रश्न व्हीएनआयटीकडे पाठविण्यात आले आहेत.

रात्री बंद राहणार ये-जा

नवीन आरओबीचे काम सध्या संथ झाल्याने आता गुरुवारच्या रात्रीपासून जुन्या पुलापर्यंत ये-जा करिता अडचणी येणार आहेत. एनएचएआयच्या सूत्रानुसार खराब झालेल्या जुन्या पुलाचे नव्याने डांबरीकरण करण्यात येणार आहे. या एकल मार्गाच्या पुलाला दोन भागात विभागून काम पूर्ण करण्यात येणार आहे. याचे काम मध्यरात्रीपासून सुरू होईल.