कॉलेजेस समोरील छेडखानी आवरा हो…

Stop molestation

नागपूर: शाळा व महाविद्यालयांसमोर टारगट युवकांनी धुडगूस घातला असून, छेड काढणाऱ्या युवकांमुळे विद्यार्थिनी त्रस्त झाल्या आहेत. शाळा महाविद्यालयीन वेळेत हे युवक विद्यार्थिनीची छेड काढतात. या टारगटांविरुद्ध पोलिस कोणतीही कारवाई करीत नसल्याचा आरोप होत आहे. या टारगटांना वेळीच आवरण्यात आले नाही तर नागरिकच कायदा हातात घेतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी छेड काढणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

शहरातील विविध मुलींची शाळा व महाविद्यालयांसमोर युवकांचा वावर असतो. अनेकदा याबाबत तक्रारी करण्यात आल्या. मात्र, पोलिस एक दिवस येतात नंतर मात्र पाठ फिरवितात, असे सांगण्यात येते. महालमधील शाळा व महाविद्यालयांसमोर नेहमीच टारगटांचा वावर असतो. ते विद्यार्थिनीची छेड काढतात. एखाद्या नागरिकाने हटकल्यास त्यांना मारहाण करतात. त्यामुळे कोणीही टारगटांना मज्जाव करण्याची हिंमत करीत नाहीत. तुळशीबाग मार्गावरील सी. पी. अॅण्ड बेरार कॉलेज व महालमधील हिंदू मुलींच्या शाळेसमोर तरुण घोळक्याने उभे राह असून विद्यार्थिनीची छेड काढण्याचे प्रकार रोजच होत असल्याचे परिसरातील नागरिक सांगतात. काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थिनीला तरुणांनी धमकीही दिली होती.

सुसाट वाहनांचाही होतो त्रास

विद्यार्थिनींची छेड काढण्यासह शाळा व महाविद्यालयांसमोर तरुणीने वेगाने वाहने चालवून जोरात हॉर्न वाजवून नाहक त्रास देतात. वाहतूक पोलिसांनी वेगाने वाहन चालविणाऱ्या तरुणांविरुद्ध कारवाई करावी. पोलिसांनी परिसरातील शाळांसमोर गस्त वाढवावी, शाळा व महाविद्यालयांच्या वेळेत या भागात साध्या गणवेशात पोलिस तैनात करण्यात यावे, महाविद्यालयीन वेळेत या भागात दामिनी पथकाची गस्त असावी, अशी मागणी विद्यार्थिनी व पालकांनी केली आहे.