रेल्वेची भाडेवाढ होणार? रेल्वे बोर्डाचे संकेत

Indian Railways
Indian Railways

नवी दिल्ली: रेल्वेच्या प्रवासी भाड्यात, तसेच माल वाहतुकीच्या भाड्यात वाढ होणार असल्याचे रेल्वे बोर्डाचे चेअरमन व्ही. के. यादव यांनी स्पष्ट केले आहे. ही भाडेवाढ तर्कसंगत पद्धतीने करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे यादव यांनी जाहीर केले आहे. मात्र, ही भाडेवाढ नेमकी किती होईल याबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला. रेल्वेच्या घसरणाऱ्या महसुलाचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक पावले उचलली गेल्याचेही यादव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

भाडेवाढ हा संवेदनशील मुद्दा असून याबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी या विषयावर दीर्घ चर्चा करण्याची आवश्यकता असल्याचे यादव पुढे म्हणाले. आम्ही भाडेवाढीबाबत ती तर्कसंगत कशी करता येईल यावर काम करत असून यावर विचारविनिमय सुरू असल्याचे ते म्हणाले. मी यात फार काही करू शकणार नाही, कारण हा एक अतिशय संवेदनशील असा मुद्दा आहे. मालावरील भाडे हे पूर्वीपासूनच जास्त आहे. रस्त्यावर होणारी अधिकाधिक मालवाहतूक आम्हाला रेल्वेकडे वळवायची आहे, असेही त्यांनी सांगितले.

आर्थिक मंदीमुळे भारतीय रेल्वेचे उत्पन्न कमी झाले आहे. चालू वित्तीय वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत रेल्वेचे प्रवासी भाड्याच्या रुपाने येणारे उत्पन्न वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत १५५ कोटी रुपये आणि माल वाहतुकीद्वारे आलेले ३९०१ कोटी रुपये इतके कमी होते. चालू वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) प्रवासी भाड्याच्या रुपाने १३, ३९८.९२ कोटी रुपयांपर्यंच मर्यादित राहिले. ही माहिती माहितीच्या अधिकाराद्वारे स्पष्ट झाली आहे.

ज्या मार्गावर अधिक प्रवासी प्रवास करतात अशा मार्गावरील प्रवास भाड्यात वृद्धी करण्याचा रेल्वेचा विचार असल्याचे वृत्त यापूर्वीच प्रसिद्ध झाले आहे. आता रेल्वे बोर्डाचे चेअरमनही असेच संकेत देत आहेत.