एसटी : यांत्रिकी कर्मचारी, वाहतूक निरीक्षकांच्या हाती स्टेअरिंग

मुंबई : कर्मचार्‍यांच्या संपामुळे राज्यातील विस्कळीत झालेली एसटी ची वाहतूक सुरू करण्यासाठी महामंडळ विविध पर्यायांचा अवलंब करीत आहे. कंत्राटी चालकांनंतर आता यांत्रिकी कर्मचारी आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांना उजळणी प्रशिक्षण देऊन चालक म्हणून नेमणूक देण्यात येणार आहे. तसेच वाहतूक नियंत्रकांना वाहकाची भूमिका बजावावी लागणार आहे. या कर्मचार्‍यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून दिवसाला 300 रुपये देण्यात येणार आहेत.

अडीच महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपावर अजूनही तोडगा निघालेला नाही. महामंडळाने वेतनवाढ देऊनही कर्मचारी कामावर येण्यास तयार नाहीत. त्यामुळे महामंडळाने निलंबन,सेवा समाप्ती आणि बडतर्फीची कारवाई सुरू केली.त्यानंतर महामंडळाने ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी 800 कंत्राटी चालकांची भरती केली.त्यानंतर आता महामंडळाने इतर विभागातील कर्मचार्‍यांना चालक आणि वाहक म्हणून नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला आहे.

पहिल्या टप्प्यात चालक पदातून ज्यांना वाहन परीक्षक आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षक या पदावर पदोन्नती दिली आहे, अशा कर्मचार्‍यांना दोन दिवसांचे उजळणी प्रशिक्षण देऊन त्यांना चालक म्हणून कामगिरी देण्यात येणार आहे. दुसर्‍या टप्प्यात ज्या यांत्रिकी कर्मचार्‍यांकडे अवजड वाहन चालविण्याचा परवाना आहे, अशा कर्मचार्‍यांची विभागीय पातळीवर माहिती गोळा करून त्यांच्याकडून विभागीय पातळीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तत्काळ आनलाईन अर्ज करून प्रवासी वाहन चालक अनुज्ञप्ती बिल्ला काढावयाचा आहे.

खाते वाहन व मार्ग तपासणी वाहनांवर नेमणूक केलेल्या चालकांना एसटी चालविण्यास देण्यात येणार आहे. वाहतूक नियंत्रण म्हणून ज्या वाहकांना पदोन्नती दिली आहे,त्यांचा वापर वाहक म्हणून करण्यात येणार आहे.