एसटी म्हणजे ग्रामीण महाराष्ट्र जोडणारा दुवाच! सामान्य नागरिक कुठेही जायचे असेल तरीही एसटीचाच पर्याय स्वीकारतात. शिवाय हाच प्रवास सुरक्षितही आहे. महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या ताफ्यात आता आणखी ५०० नव्या बस येणार आहेत. या बस खरेदीसाठी राज्य शासनाकडून निधी देण्यात येईल अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ५०० नवीन बसगाड्या खरेदी करण्यासाठी राज्य शासनाकडून निधी देणार. आवश्यक निधीपैकी साडेबारा कोटी रुपयांचा लवकरच उपलब्ध करुन देण्याची अर्थमंत्री @SMungantiwar यांची घोषणा pic.twitter.com/FKuwl7RW5b
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 6, 2018
सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला एसटी महामंडळाचे संचालक रणजीतसिंह देओल आणि इतर अधिकारी उपस्थित होते. बस खरेदीसाठी लागणाऱ्या निधीपैकी १२.५ कोटींचा निधी नजीकच्या काळात तर उर्वरित निधी हा विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात उपलब्ध करून दिला जाईल असेही सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. सर्व सामान्यांना चांगल्या बसने प्रवास करता यावा म्हणून या नव्या बस खरेदी केल्या जाणार आहेत. महामंडळानेही पुढाकार घेऊन बस स्थानकं स्वच्छ आणि सुंदर ठेवावीत असेही आवाहन मुनगंटीवार यांनी केले.
या बैठकीत वर्धा, देवळी, सेलू, वडसा, गडचांदूर, कोरपना, नागभीड, चंद्रपूर, बल्लारपूर, सावली, भद्रावती, राजुरा, चिमूर, बस स्थानकांच्या कामांचाही आढावा घेण्यात आला. चंद्रपूर, मूल, बल्लारपूर स्थानकांच्या कामाचे कार्यादेशही देण्यात आले. उर्वरित बस स्थानकांच्या कामांना गती द्या, ज्या कंत्राटदारांना बसस्थानकांची कामे दिली आहेत त्यांच्याकडून ती वेळेत पूर्ण करून घ्या त्याचा दर्जा चांगला असणे आवश्यक आहे अशाही सूचना अर्थमंत्र्यांनी दिल्या.
अधिक वाचा : रेल्वेच्या डब्यांबाहेर आरक्षणाची यादी चिकटवण्याची प्रथा बंद