नागपूर : शहराच्या विविध भागांतून हायटेक पद्धतीने चोरी होणाऱ्या कार्सचा शोध घेण्यासाठी नागपूर शहर पोलिसांनी खास पथकांची नेमणूक केली आहे. जिल्ह्यातील वेगवेळ्या भागांमध्ये ही पथके रवाना झाली आहेत.
लॅपटॉपचा वापर करून आणि महागड्या कार्सचे सॉफ्टवेअर हॅक करून जानेवारी ते एप्रिलपर्यंत तब्बल १४ पेक्षा अधिक कार नागपुरातून चोरी झाल्या आहेत. चोरी झालेल्या या कार्सची चोरट्यांनी आतापर्यंत विल्हेवाटही लावली आहे, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. चार महिन्यात १४ पेक्षा जास्त कारचोरी हा आकडा मोठा असून आता पोलिसांनी गंभीरतेने घेतला आहे. चोरी झालेल्या या कार्स जात तरी कोठे आहेत, याचा माग घेण्यासाठी नागपूर शहर गुन्हे शाखा पोलिसांनी पथकांची नेमणूक केली आहे. ज्या ज्या भागांतून कार्सची चोरी झाली, त्या त्या भागांतील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा शोध घेण्यात येणार आहे. गरज भासल्यास पथकांना मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशात जाण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
‘स्वीफ्ट’ही चोरीचीच?
हायटेक पद्धतीने केल्या जाणाऱ्या चोऱ्यांसाठी पाच जणांची टोळी सक्रिय असल्याची माहिती आहे. या टोळीकडून स्वीफ्ट कार आणि दोन लॅपटॉप वापरण्यात येत आहेत. टोळीकडून वापरण्यात येणारी स्वीफ्ट कारही चोरीचीच असल्याच दाट संशय व्यक्त होत आहे. ही स्वीफ्ट पोलिसांच्या हाती लागू नये म्हणुन त्यावरील नंबर प्लेटही काढून ठेवण्यात आल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. मात्र नंबरप्लेट नसलेली कार पोलिसांच्या नजरेतून सुटतेच कशी, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
नाकाबंदी फुसकी
वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांकडून कडक नाकाबंदी करण्यात येत असल्याचा दावा करण्यात येतो. परंतु गेल्या वर्षभरात शहरातून दुचाकी आणि चारचाकी चोरीच्या घटनांचा आलेख पाहता ही नाकाबंदी फुसकी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून होऊ लागला आहे. मध्यरात्रीनंतर शहरात फिरणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी चालकांनी व्यवस्थित तपासणीच होत नाही, असा दावा आता खुद्द पोलिस दलातीलच काही जण करू लागले आहेत.
कार चोरीच्या प्रकरणात आम्ही खास पथकांची नेमणूक केली आहे. त्यांच्याकडे अन्य कोणतेही काम देण्यात आलेले नाही. चोरांची ही टोळी लवकरच गजाआड होईल, याबाबत नागरिकांनी विश्वास बाळगावा. काही माहिती असल्यास ती आम्हाला द्यावी.
– श्वेता खेडकर, प्रभारी पोलिस उपायुक्त (गुन्हे शाखा)
अधिक वाचा : सुप्रिया चॅटर्जी विम्बलडनची पंच