गणेशोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय योजनांत सहभाग घ्या! – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर,ता. ९ : सार्वजनिक गणेशोत्सव हे जनजागृतीचे उत्तम माध्यम आहे. उत्सवाच्या निमित्ताने सर्व नागरिक एकत्र येतात. श्रद्धेने सार्वजनिक गणेश मूर्तींचे दर्शन घेतात. त्यामुळे लोककल्याणकारी राष्ट्रीय योजनांची उत्सवाच्या माध्यमातून जनजागृती करा आणि स्वच्छ भारत अभियानात सहभाग नोंदवा, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतानाचा ‘पाणी वाचवा’ हा संदेश प्रभावीपणे द्या, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेनागपूर महानगरपालिकेच्या महाल स्थित राजे रघुजी नगर भवन येथे गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार आशीष देशमुख, आमदार जोगेंद्र कवाडे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप यादव, पोलिस अधीक्षक (नागपूर ग्रामीण) राकेश ओला उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेयावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, सार्वजनिक उत्सव शांततेत पार पाडण्याची नागपूरची परंपरा आहे. भोसले काळापासून उत्सवाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामाजिक विषयांची जनजागृती करण्याचे कार्य नागपूरकर करीत असतात. हा उत्सव नागपूरकरांचा आणि नागपुरातील प्रत्येकाचा आहे. समाजातील सर्वच घटक या उत्सवात सहभागी होत असतात. सार्वजनिक गणेश उत्सवाचा जो उद्देश आहे तो साध्य व्हावा, हाच आमचा प्रयत्न आहे. यासाठी गणेश मंडळांचे सहकार्य अपेक्षित आहे. शासनाने समाजातील सर्वच घटकांसाठी ज्या लोककल्याणकारी योजना आणल्या आहेत, त्याची माहिती आणि उद्देश या उत्सवाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहचविण्याचे कार्य गणेश मंडळांनी करावे.

स्वच्छ भारत अभियान ही परिवर्तनाची नांदी आहे. या अभियानांतर्गत नागपुरात मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे कार्य झाले आहे. हे कार्य गणेश मंडळांनी पुढे न्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. नागपूर शहरातील तलाव हे नागपूरचे वैभव आहे. ह्या तलावांचे महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी आणि जलप्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम तलावांचा वापर विसर्जनासाठी करावा. उत्सवाच्या माध्यमातून ‘पाणी वाचवा’ हा संदेश मोठ्या प्रमाणात द्यावा. एकंदरच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची कास धरावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

महापौर नंदा जिचकार यांनी महानगरपालिकेतर्फे उत्सवादरम्यान करण्यात येणाऱ्या व्यवस्थेबद्दल सांगितले. गणेशोत्सवादरम्यान जलप्रदूषण टाळण्यासाठी महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध आहे. घरगुती गणेश विसर्जनासाठी प्रत्येक प्रभागामध्ये विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येणार आहे. नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही, याची संपूर्ण काळजी घेण्यात येईल. नागरिकांनी या कार्यात प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

गणेश मंडळांना देण्यात येणारी परवानगी, उत्सवादरम्यानची वाहतूक व्यवस्था याबाबत पोलिस उपायुक्त राकेश ओला यांनी माहिती दिली. याप्रसंगी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना येणाऱ्या अडचणींसंदर्भातील प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिलीत. बैठकीला नागपूर महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी आणि गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा : ९ ऑगस्ट क्रांती शहीद दिन निमित्त महापौर, उपमहापौर व्दारा हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण