थुंकणारे, उघड्यावर लघवी करणारे पडकले

नागपूर

नागपूर: शहराला विद्रुप करणाऱ्यांवर कारवाई सुरूच असून, रविवारी रस्त्यांवर थुंकणाऱ्यासह उघड्यावर लघवी करणारेही अलगद अडकले. घरानजीकच्या परिसरात कचरा फेकणारेही मोठ्या प्रमाणात पथकाच्या हातात लागले. एकूण ३७ उपद्रवींवर पथकाने कारवाई करीत त्यांच्याकडून ५८०० रुपयांचा दंड ‘ऑन द स्पॉट’ वसूल केला. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या या कारवाईमुळे शहर अस्वच्छ करणाऱ्यांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे.

संविधान चौक, सीताबर्डी नागपूर येथे कारवाईनंतर शनिवारला मोठी कारवाई उपद्रव शोध पथकाने हाती घेतली होती. यात मोरभवन, गांधीपुतळा आणि धरमपेठ, मंगळवारी झोन कार्यालयात उपद्रव शोध पथकाने पाळत ठेवली. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली आहे.

धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाकडून मोरभवन परिसरातील उपद्रवींवर कारवाई करण्यात आली. मोरभवन परिसरात थुंकणाऱ्या ४ व परिसरात कचरा टाकणाऱ्या १३ अशा एकूण १७ जणांवर कारवाई करून २१०० रुपये दंड वसूल करण्यात आले. मंगळवारी झोनच्या पथकाकडून गांधीपुतळा चौकात थुंकणाऱ्या ७, उघड्यावर लघवी करणारा १, परिसर अस्वच्छ करणारा १ आणि परिसरात कचरा टाकणाऱ्या ४ अशा एकूण १३ उपद्रवींवर कारवाई करीत २७०० रुपये दंड वसूल करण्यात आले. याशिवाय उपद्रव शोध पथकाकडून सिव्हिल लाइन्स येथील मनपा मुख्यालय परिसरातही कारवाई करण्यात आली.

मनपा मुख्यालय परिसरातील थुंकणाऱ्या ३ व परिसरात कचरा टाकणाऱ्या ४ अशा एकूण ७ जणांकडून १ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तिन्ही कारवायांमध्ये थुंकणाऱ्या एकूण १४, उघड्यावर लघवी करणारा १, परिसर अस्वच्छ करणारा १, परिसरात कचरा टाकणाऱ्या एकूण २१ अशा तिन्ही ठिकाणच्या एकूण ३७ उपद्रवींवर एकाच दिवशी कारवाई करण्यात आली. स्वच्छ भारतचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ व मंगळवारी झोन पथकाकडून तीन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.