नागपूर शहरातील प्रकल्पांना गती द्या : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निर्देश

विविध प्रकल्पांचा घेतला आढावा

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी Nagpur नागपूर

नागपूर : नागपूर शहरातील सर्व निर्माणाधीन प्रकल्पांच्या कार्याचा वेग वाढवून तातडीने पूर्ण करण्यात यावे आणि प्रस्तावित प्रकल्पांची प्रशासकीय पूर्तता करून त्या कामांच्या निविदा काढण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

शासनाच्या विविध विभागांतर्गत नागपूर शहरात सुरू असलेल्या प्रस्तावित आणि निर्माणाधीन प्रकल्पांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी बुधवारी (ता. ३०) आयोजित बैठकीत सदर निर्देश त्यांनी दिले. बैठकीला महापौर नंदा जिचकार, मनपाच्या स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, बी.ओ.टी., पीपीपी प्रकल्पांच्या पाठपुराव्यासाठी नेमण्यात आलेल्या प्रकल्प विशेष समितीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, मनपा आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, नासुप्र सभापती शीतल उगले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार उपस्थित होते.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सुमारे पाच हजार गाळ्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून ते वाटपासाठी तयार आहेत, अशी माहिती नासुप्रच्या सभापती शीतल उगले यांनी दिली. योजनेअंतर्गत आलेल्या अर्जांची सोडत काढण्यात यावी. अपूर्ण अर्जांमधील त्रुट्या दूर करून, आवश्यक बाबींची पूर्तता करुन त्या अर्जांचाही सोडतीत समावेश करण्यात यावा, असेही निर्देश ना. नितीन गडकरी यांनी दिले.

अंबाझरी येथील खुल्या रंगमंचासाठी (ॲम्पी थिएटर) आवश्यक २३ एकर जागेपैकी साडे सात एकर जागेचा ताबा नासुप्रला मिळाला असल्याची माहिती नासुप्र सभापती शीतल उगले यांनी दिली. उर्वरीत जागेसंदर्भात जिल्हाधिकारी आणि नासुप्र सभापतींनी तातडीने विद्यापीठ कुलगुरुंशी बैठक घ्यावी व ती जागा ताब्यात घ्यावी. त्या जागेवर सुरक्षा भिंत करून शक्य तितक्या लवकर पुढील प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले.

केळीबाग रोड, जुना भंडारा रोड, गड्डीगोदाम, पारडी, सोमलवाडा, रामजी पहेलवान मार्गासाठी जागा उपलब्ध करून देण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला संमतीपत्र देण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. गड्डीगोदाम आणि पारडी रस्त्यांबाबतची कार्यवाही १ फेब्रुवारी रोजी, जुना भंडारा रोड, केळीबाग रोड, रामजी पहेलवान रस्त्याबाबतची कार्यवाही ६ फेब्रुवारी रोजी तर गड्डीगोदाम, सोमलवाडा रस्त्यांच्याबाबतची कार्यवाही १६ फेब्रुवारी रोजी सुरु करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.

केळीबाग मार्गावरील बुधवार बाजाराच्या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. त्या कामाच्या निविदा काढून प्रत्यक्ष कार्याला सुरुवात लवकरात लवकर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सक्करदरा येथील बुधवार बाजाराचे अंतिम डिझाईन सात दिवसांत तयार करून त्याच्याही निविदा काढण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यशवंत स्टेडियम येथील प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियलसंदर्भात सूचनांसह नवीन प्रस्ताव तयार करण्यात यावा. स्थायी समिती सभापती, जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी त्याला अंतिम स्वरूप देऊन पुढील काही दिवसांत तो राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्याचे निर्देशही ना. गडकरी यांनी दिले. नागपूर मेट्रो रेल्वेतर्फे पाटणी चौकापर्यंत बांधण्यात येणाऱ्या डबल डेकर पुलाच्या लॅण्डींगमधील तांत्रिक आणि वाहतुकीच्या दृष्टीने व्यवहार्यता तपासण्यात यावी व त्यानंतरच त्याबाबत योग्य निर्णय घेण्यात यावा, असे निर्देश ना. नितीन गडकरी यांनी दिले. अजनी पूल ते वर्धा रोडला जोडणाऱ्या कारागृह परिसरातून जाणाऱ्या रस्त्याचे लोकार्पण शक्यतो २२ फेब्रुवारी दरम्यान करण्याचे निर्देशही ना. गडकरी यांनी दिले.

विद्यार्थ्यांसाठी ‘विज्ञान केंद्र’
नागपूर महानगरपालिकेचे विद्यार्थी अपूर्व विज्ञान मेळाव्याच्या माध्यमातून अतिशय सुंदर नावीन्यपूर्ण मॉडेल तयार करतात. त्यांच्या कल्पनांना प्रोत्साहन मिळावे यासाठी मनपाच्या एखाद्या बंद अवस्थेत असलेल्या शाळेच्या जागेवर सुंदर इमारत करून विज्ञान केंद्र विकसित करण्यात यावे. जेथे विद्यार्थी येतील. दिवसभर थांबून आपल्या प्रयोगाचे मॉडेल तयार करतील. यामुळे शहरातील विद्यार्थी वैज्ञानिकांना वाव मिळेल. ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके यांनी सुचविल्यानुसार राहतेकर वाडी येथील शाळेच्या जागेवर ही इमारत उभारण्यासाठी १० कोटींचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश ना. गडकरी यांनी दिले.

खेळाच्या मैदानांचा विकास
नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत खेळाच्या मैदानांचा विकास करण्याकरिता ६० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या मैदानांसाठी जिल्हाधिकाऱ्यांतर्फे लाल मुरुम घेऊन त्यावर टाकण्यात यावा. नासुप्रने तयार केलेल्या कमी क्षमतेच्या सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पातील पाणी टँकरद्वारे या मैदानांवर टाकण्यात यावे. काही पाणी निर्माणाधीन इमारतींना व्यावसायिक स्वरूपात देण्यात यावे. यासाठी आवश्यक किमान १५ ते २० टँकर नासुप्रने खरेदी करावे, असेही ना. गडकरी यांनी निर्देशित केले.

अधिक वाचा : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या ‘लोगो’चे अनावरण