हॅकॉथॉनसाठी १५०० जणांचा ऑनलाईन प्रवेश

१ फेब्रुवारीला सादरीकरण : 'इनोव्हेशन' वर मार्गदर्शन

नागपूर

नागपूर : महापौर नंदा जिचकार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘मेयर इनोव्हेशन अवॉर्डस्‌’ अंतर्गत आयोजित ‘हॅकॉथॉन’साठी ऑनलाईन प्रवेशाच्या अंतिम मुदतीपर्यंत ५०० चमूंनी प्रवेश नोंदविला आहे. सुमारे १५०० लोकांचा सहभाग हॅकॉथॉनमध्ये असणार आहे.

१ फेब्रुवारी रोजी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सकाळी १० वाजतापासून ‘हॅकॉथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. उद्‌घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल. राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. महापौर नंदा जिचकार अध्यक्षस्थानी राहतील. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सिद्धार्थविनायक काणे, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, नवी दिल्ली येथील एआयसीटीईचे सल्लागार दिलीप मालखेडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहील.

हॅकॉथॉनची तयारी पूर्ण

शहरातील विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी वेगवेगळ्या विषयांवर नवीन काहीतरी सुचविण्यासाठी आयोजित हॅकॉथॉनची तयारी पूर्ण झाली आहे. ऑनलाईन नोंदणीची अंतिम तारीख ३० जानेवारी होती. अंतिम दिवसापर्यंत ५०० चमूंनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांसोबतच नागरिकांनीही यात नोंदणी केली आहे. कविवर्य सुरेश भट सभागृहात चार झोन तयार करण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना ए, बी, सी, डी अशा चार गटात विभागण्यात येणार आहे. स्पर्धकांनी स्पर्धास्थळी आपली उपस्थिती दर्शविल्यानंतर त्यांना गट देण्यात येईल. संबंधित गटाच्या झोनमध्ये त्यांना आपल्या प्रकल्प अहवालाचे सादरीकरण करावयाचे आहे.

मार्गदर्शन आणि मनोरंजनपर कार्यक्रम

हॅकॉथॉनच्या निमित्ताने कविवर्य सुरेश भट सभागृहात येणाऱ्या सहभागी विद्यार्थी, लोकांसाठी ‘इनोव्हेटिव्ह आयडिया’ या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यासोबतच मनोरंजनासाठी रॉक बॅण्डचेही आयोजन करण्यात आले आहे. ज्या स्पर्धकांच्या मॉड्यूलचे प्रात्यक्षिक आहे, त्यांच्यासाठी स्वतंत्र दालन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या दालनात सर्व प्रात्यक्षिकांची प्रदर्शनी राहील. सकाळी ९ ते ११ या वेळेत शाळकरी विद्यार्थ्यांसाठी ‘आदर्श नागपूर’ या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले आहे.

महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

मेयर इनोव्हेशन अवॉर्ड अंतर्गत आयोजित हॅकॉथॉनला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळावा, उपक्रम आयोजनामागील हेतू विद्यार्थ्यांना माहिती व्हावा यासाठी शहरातील विविध महाविद्यालयात विद्यार्थ्याना मार्गदर्शन करण्यात आले. सेल्फी कॉर्नर ठेवून त्यामाध्यमातूनही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. महाल येथील राजे रघुजी भोसले नगर भवन येथे मनपा विभागप्रमुख आणि विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन कार्यक्रमही घेण्यात आला. यावेळी मनपा विभागप्रमुखांना त्यांना दैनंदिन कार्यात येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाय याबाबत सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसनही यावेळी करण्यात आले. हॅकॉथॉनपूर्व राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे ऑनलाईन प्रवेशाला सर्वच महाविद्यालयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अधिक वाचा : नागपूर शहरातील प्रकल्पांना गती द्या : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निर्देश