मनपातर्फे सहा टन प्लास्टिक जप्त, गांधीबाग झोनअंतर्गत कारवाई

Date:

नागपूर:  महाराष्ट्रात प्लास्टिकवर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात साठा करून चिल्लर दुकानदारांना पुरविणाऱ्या गांजाखेत येथील एका व्यापाऱ्याच्या गोदामावर गांधीबाग झोनअंतर्गत उपद्रव शोध पथकाने कारवाई केली. या कारवाईत सुमारे सहा टन प्लास्टिक जप्त केले असून पाच लाखांच्या घरात त्याची किंमत आहे.

प्राप्त माहितीनुसार, गोळीबार चौकालगत असलेल्या गांजाखेत येथील गुरुनानक स्टोअर्सच्या गोदामात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या वस्तू साठवून ठेवण्यात आल्या असल्याची माहिती उपद्रव शोध पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे पथकाने संबंधित दुकानाच्या गोदामावर छापा मारला. यात पथकाला सुमारे ५९५२ किलोच्या प्लास्टिकच्या वस्तूंचा साठा आढळला. दुकानाचे मालक ओमप्रकाश वाधवानी हे गोदामातून चिल्लर व्यापाऱ्यांना हा माल पुरवित असल्याची माहिती पथकाला मिळाली. शासनाची बंदी असतानाही अनधिकृतरीत्या साठा आढळल्यामुळे शासन नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेने केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. यापूर्वीही या परिसरातून तीन लाख रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला होता.

नागपूर महानगरपालिकेतर्फे प्लास्टिकमुक्त शहरचे आवाहन करण्यात आलेले आहे. प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्लास्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची नागपूर महानगरपालिका हद्दीत कडक अंमलबजावणी सुरू असून मनपा आरोग्य विभाग(स्वच्छता) आणि उपद्रव शोध पथकाच्या माध्यमातून नियमित कारवाई करण्यात येते. दहाही झोनअंतर्गत सुमारे ८७ जणांचे पथक झोननिहाय कार्यरत आहे. नागपूर शहरात आतापर्यंत उपद्रव शोध पथकाने ८७६ प्रकरणातून सुमारे ४४ लाखांच्या वर रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी बर्डी परिसरातही उपद्रव शोध पथकाने मोठी कारवाई करीत प्लास्टिकचा मोठा साठा जप्त केला होता. सदर कारवाई स्वच्छ भारत अभियानचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील, उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात पथकाच्या सदस्यांनी केली.

प्लास्टिकबंदीसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा : आयुक्त

प्लास्टिक बंदी नियमांतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे कारवाईचा वेग वाढविण्यात आला असून नागरिकांनी यासाठी स्वत: पुढाकार घेण्याचे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे. नागपूर शहरातील मोठे व्यावसायिक अथवा चिल्लर दुकानदार जे नियमांचे उल्लंघन करीत असेल त्याची माहिती मनपा अधिकारी किंवा उपद्रव शोध पथकाला द्यावी. अशा व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्त बांगर यांनी सांगितले.

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related