नागपूर : महापालिका प्रशासनाच्या मनमानीमुळे त्रस्त झालेल्या व्यापाऱ्यांची सहनशीलता आता संपली आहे. पहिले लॉकडाऊन नंतर अनलॉकमुळे व्यापारी प्रभावित झाला आहे. आर्थिक संकटाशी झुंज देत असलेल्या व्यापाऱ्यांवर मनपा प्रशासनाद्वारे दररोज नवनवीन आदेश लादले जात आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी मनपाच्या विरोधात १९ ऑगस्ट रोजी सांकेतिक आंदोलनाचा इशारा दिला आहे.
यासंदर्भात सोमवारी विदर्भातील १३ लाख व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स (एनव्हीसीसी) व नागपूर शहरातील व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नागपूर चेंबर ऑफ कॉमर्स लि. (एनसीसीएल) ने आपापल्या कार्यालयात आपात्कालीन बैठक बोलाविली. बैठकीला शहरातील वेगवेगळ्या व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत दोन्ही व्यापारी संस्थांनी १९ ऑगस्ट रोजी नागपूर बंदची घोषणा केली. बंदचा उद्देश पालकमंत्री, मनपा प्रशासन, महापौर, सत्तापक्ष व विरोधी पक्ष नेत्यांचे व्यापाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधून, त्या मंजूर करण्यासाठी दबाव बनविण्याचा प्रयत्न आहे. एनव्हीसीसीचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया व एनसीसीएलचे अध्यक्ष विष्णूकुमार पचेरीवाला लोकमतशी बोलताना म्हणाले की, लॉकडाऊन व अनलॉकमध्ये शहरातील व्यापाऱ्यांची आर्थिक अवस्था कमकुवत झाली आहे. अशातही प्रशासनाला कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सहकार्य करीत आहोत. तरीही मनपा प्रशासन दररोज नवीन आदेश व्यापाऱ्यांवर लादत आहे.
इतर शहरांमध्ये ऑड-ईव्हन डे पॅटर्नने बाजार सुरू करण्याचे आदेश निरस्त झाले आहेत. पण नागपुरात कायम आहे. त्याचबरोबर मनपा आयुक्तांनी शहरात व्यापार करण्यासाठी ट्रेड लायसन्स घेण्याचा आदेश जाही केला आहे. यामुळे इन्स्पेक्टर राज वाढेल व व्यापाऱ्यांवर आर्थिक बोजा पडणार आहे. त्याचबरोबर व्यापारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट अनिवार्य करण्याच्या आदेशामुळे अडचणी वाढणार आहे. आर्थिक संकटामुळे त्रस्त झालेला व्यापारी दररोज नवीन आदेशाचा बोज सहन करणार नाही, असा इशारा आंदोलनातून देण्यात येणार आहे. आदेश रद्द करून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांची आहे.
महापौर व पालकमंत्र्यांना दिले निवेदन
एनव्हीसीसीच्या प्रतिनिधी मंडळाने सोमवारी पालकमंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यासंदर्भात निवेदन सादर केले. सोबतच आयुक्तांनी ट्रेड लायसन्स आदेश रद्द करण्याची विनंती केली. तर एनव्हीसीसी व एनसीसीएलच्या शिष्टमंडळाने महापौर संदीप जोशी यांची भेट घेऊन मनपाच्या सभेत व्यापाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधावे, अशी विनंती केली.
काय आहेत मुख्य मागण्या
शहरात ऑड-ईव्हन डे पॅटर्न बंद करावा.
मनपा आयुक्तांनी काढलेला ट्रेड लायसन्सचा आदेश रद्द करावा.
व्यापाऱ्यांच्या कोरोना टेस्टचा आदेश मागे घ्यावा.