मुंबई, 25 नोव्हेंबर: राज्यात भाजपकडून बहुमतासाठी ऑपरेशन लोटस सारखी मोहीम आखली जात असल्याचं समोर येत आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे काही आमदार भाजपसोबत जाण्याच्या भीतीनं त्यांच्यावर करडी नजर ठेवण्यात आली आहे. असं असलं तरीही शिवसेनेच्या गोटातून खळबळ उडवणारी मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे 15 ते 20 आमदार देवेंद्र फडणवीस सरकारला पाठिंबा देण्यासाठी तयार असल्याचं समोर आलं आहे. रविवारी रात्री झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी आमदारांना प्रश्न विचारला इतकं सगळं झाल्यानंतरही भाजपला कोण पाठिंबा देण्यासाठी इच्छुक आहे? त्याबाबत आमदारांमध्ये संभ्रम असल्याचं लक्षात येताच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आमदारांसोबत रात्री हॉटेल ललितमध्ये थांबले होते. आपल्या पक्षातून फुटून भाजपकडे जावू नयेत यासाठी शिवसेनेकडून संपूर्णपणे सुरक्षा व्यवस्था बाळगण्यात येत आहे. भाजपकडून आमदार पळवण्याचा डाव उलथवून टाकण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली आहे. भाजपला शिवसेनेतील 15 ते 20 आमदार पाठिंबा देण्यासाठी तयार आहेत. हे आमदार भाजपला पाठिंबा देण्यासाठी जावू नयेत यासाठी उद्धव ठाकरेंनी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली आहे.
155 आमदार भाजपच्या बाजूनं असल्याचा दावा
सध्याच्या घडीला 155 आमदारांचा पाठिंबा भाजपला असल्याचा दावा करण्यात आला आहे. 105 भाजपचे आमदार, अजित पवारांसोबत आलेले 25 आमदार आणि 15 अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचं भाजपने स्पष्ट केलं आहे. तर विरोधी पक्षांनी त्यांच्याकडे 161 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.
सत्ता संघर्षाचा वाद कोर्टात आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.