Share Market Update : सात दिवसांच्या सततच्या घसरणीनंतर, शुक्रवारी भारतीय शेअर मार्केट(share market)थोडी सुधारणा दिसून आली. सेन्सेक्समध्ये (Sensex) शुक्रवारी सकाळच्या सत्रात सुमारे १६०० अंकांनी सुधारणा झाली. सेन्सेक्स ५६ हजारांवर व्यवहार करत आहे. तर निफ्टी (Nifty) ५०० अंकांनी वर जाऊन १६,७०० वर करत आहे. दरम्यान, बिटकॉईन, इथेरियम या क्रिप्टोकरन्सी १७ टक्क्यांनी वधारल्या आहेत.
युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यासह काही देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. यामुळे अमेरिकेसह आशियाई शेअर बाजार गुरुवारच्या घसरणीनंतर शुक्रवारी सावरले. जपानचा बेंचमार्क निक्केई १.४ टक्क्यांनी वाढून व्यवहार करत आहे. दक्षिण कोरियाच्या शेअर बाजार कोस्पीने १.२ टक्क्यांनी वाढून २,६८१ अंकांवर झेप घेतली आहे. (Share Market Update)
रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे गुरुवारच्या सत्रात भारतीय शेअर बाजारांची दाणादाण उडाली होती. सेन्सेक्स २७०२ अंकांनी घसरण ५४ हजार ५२९ अंकांवर बंद झाला होता. निफ्टीही घसरला होता. यामुळे गुंतवणूकदारांना १३ लाख कोटींचा फटका बसला होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रतिपिंप १०० डॉलरवर गेली आहे. हा उच्चांकी दर २०१४ नंतर प्रथमच जगाला अनुभवायला मिळाला आहे. याचाही फटका भारतीय शेअर बाजाराला बसला होता.