नागपूर – काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रतिनिधीमंडळात किमान समान कार्यक्रमावर चर्चा सुरू आहे. लवकरच यातून तोडगा निघून राज्यात स्थिर सरकार देऊ अशी ग्वाही देतानाच मध्यावधी निवडणुकांची कोणतीही शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे फेटाळून लावली. नागपूर प्रेस क्लबतर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.
सरकार केव्हा स्थापन होईल हे मी आताच सांगू शकत नाही. पण, येणारे सरकार स्थिर असेल. किमान समान कार्यक्रमावर तीनही पक्षांत चर्चा सुरू आहे. प्रत्येक मुद्यावर आमची साधक बाधक चर्चा सुरू आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष तर शिवसेना हिंदुत्ववादी आहे. सरकार चालविताना धर्मनिरपेक्षतेवर आम्ही कायम राहू असे सांगतानाच किमान समान कार्यक्रमावरील चर्चेत सेनेच्या हिंदुत्वावरही चर्चा झाली असेल, असे पवार म्हणाले.
पंचनामे सरसकट हवे
विदर्भासह राज्यात प्रचंड पीकहानी झाली आहे. कापूस, सोयाबीन, धान, संत्रा पीकांचे खूप नुकसान झाले आहे. राज्य सरकारने 33 टक्के नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. परंतु झालेले नुकसान पाहाता सरसकट पंचनामे हवे, असे पवार म्हणाले. शेतीचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.
मदतीसाठी कृषीमंत्रालयात बैठक
याक्षणी कर्जमाफी ऐवजी केंद्रीय कृषी आणि अर्थमंत्रालयाकडून शेतकऱ्यांना तातडीने दीर्घ मुदतीचे कर्ज अथवा शून्य व्याज दराने कर्ज अशी काही मदत करता येईल का, हे तपासून पाहात आहाे. या अनुषंगाने सोमवारी संबंधित मंत्रालयात बैठका लावल्या आहे. मी पूर्वी कृषीमंत्री म्हणून केंद्रात काम केले आहे. त्यामुळे निर्णय घेण्याचे अधिकार कुठे आहेत, हे मला माहिती आहे. इथे निर्णय झाले नाही तरच पंतप्रधानांची भेट घेऊन चर्चा करू, असे पवारांनी स्पष्ट केले.
महिला मुख्यमंत्री सध्याच नाही
राज्यात एकदाही महिला मुख्यमंत्री झाली नाही. पण, त्यासाठी अनुकूल वातावरण सध्या नाही. त्यासाठी बहुमत आणि तशी मागणीही हवी. सध्या तसे काही नसल्यामुळे हा विषय सध्या तरी चर्चेला नाही, असे सांगत पवारांनी शिताफीने हा विषय बाजूला सारला.
“मी पुन्हा येईल’वरून उडवली टर
राज्यातील महाशिवआघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही, असे भाकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या बाबत विचारले असता पवारांनी हा विषय हसण्यावरी नेत मुख्यमंत्र्यांची टर उडवली. “मी पुन्हा येईल’ याचा त्रिवार उल्लेख करीत “ते ज्योतिषशास्राचे अभ्यासक आहेत हे मला माहिती नाही’, असे म्हणत पवारांनी फडणवीसांची टर उडवली.