नागपूर : पारडीतील हनुमान मंदिर परिसरात भरधाव टिप्परने दोन बहिणींना चिरडून ठार केले. हा अपघात एवढा भीषण होता की, दोन बहिणींना टिप्परने सुमारे २० फुटांपर्यंत फरफटत नेले. त्यामुळे त्यांच्या शरीराचे तुकडे झाले. ही थरारक व अंगावर शहारे आणणारी घटना बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. लक्ष्मी रमाशंकर शाहू (वय २१) व आचल रमाशंकर शाहू (वय १९, दोन्ही रा. बिडगाव रोड), अशी मृतांची नावे आहेत. आंचल ही प्रथम वर्षाला शिकत होती.
रमाशंकर शाहू यांचे घरीच किराणा दुकान आहे. बुधवारी सकाळी दोघी एमएच-४९-एझेड-९३३१ या क्रमांकाच्या मोपेडने दूध आणण्यासाठी गेल्या. दूध खरेदी करून दोघी घरी परत जात होत्या. मोपेड आचल चालवित होती. याच भागात उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने आचलने यूटर्न घेतला. याचवेळी भंडाऱ्याकडून आलेल्या एमएच-४०-एके-१००८ या क्रमांकाच्या टिप्परने मोपेडला धडक दिली. आचल ही समोरच्या चाकात तर लक्ष्मी ही मागील चाकात फसली. वेग अधिक असल्याने दोघींना टिप्परने सुमारे २० फूट अंतरापर्यंत फरफटत नेले. यात दोघींच्या शरीराचे अक्षरश: तुकडे झाले. अपघातानंतर चालक ट्रक सोडून पसार झाला. या घटनेने नागरिक संतापले. त्यांनी पोलिसांविरोधात रोष व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी दोघींच्या शरीराचे तुकडे चादरीत जमा केला. ते मेयो हॉस्पिटलकडे रवाना केले. या घटनेने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. एक तासानंतर वाहतूक सुरळीत झाली. कळमना पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून टिप्परचालकाचा शोध सुरू केला आहे.
शाहू कुटुंबावर दु:खाचा डोंगर
रमाशंकर शाहू यांना तीन मुली. दोन महिन्यांपूर्वीच मोठ्या मुलीचे लग्न झाले. रमाशंकर हे लक्ष्मीच्या लग्नाची तयारी करीत होते. ते मुलाच्या शोधात होते. एकाच वेळी दोन मुलींचा मृत्यू झाल्याने शाहू कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रमाशंकर यांच्या पत्नी नातेवाइकांच्या लग्नासाठी बाहेरगावी गेल्या आहेत. ‘मै ही हमेशा दूध लाने जाता था, पर आज दोनो गई और..’असे म्हणत रमाशंकर हे धायमोकलून रडत आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
अधिक वाचा : नवोदय बँकेत ३८ कोटींचा घोटाळा