पूर्व नागपुरातील समस्यांवर सेना, भारिप-बहुजन महासंघ व वंचितचे आंदोलन

East-Nagpur

नागपूर: पूर्व नागपुरातील रस्त्यांवरील खड्डे व विविध समस्यांविरोधात शिवसेना आणि भारिप-बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्यावतीने गुरुवारी करण्यात आलेल्या आंदोलनाने डिप्टी सिग्नल व पारडी परिसरात राजकीय वातावरण तापले.

पूर्व नागपूरच्या डिप्टी सिग्नल परिसरातील रस्त्यांच्या दयनीय स्थितीच्या विरोधात भाजपच्या मित्रपक्ष शिवसेनेचे पूर्व नागपूर प्रमुख यशवंत रहांगडाले यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. डिप्टी सिग्नलचा मुख्य रस्ता व इतर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्याचे काम बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागले. अपूर्ण रस्त्यांमुळे व्यापार ठप्प झाला. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसैनिकांनी यावेळी दिला. आंदोलनात मोहन गुरूपंच, विजय साहू, मधुसूदन सोनी, छगन सोनवणे, अरविंदसिंग राजपूत, समित कपाटे, रोशन निर्मलकर, विकास कौशले, दीपक अग्रवाल, हेमंत चोरमारे, वसंत सार्वा, निळकंठ साहू, कैलास वर्मा, अनिल निर्मलकर, जितेन कावरे सहभागी झाले होते.

पूर्व नागपुरातील विविध समस्यांविरोधात भारिपचे प्रदेश सरचिटणीस सागर डबरासे, रवी शेंडे व गणेश हरकंडे यांच्या नेतृत्वात वाठोडा येथील स्वामी नारायण मंदिराजवळ ठिय्या देऊन निदर्शने करण्यात आली. या मतदारसंघात जलवाहिनी जुनी असल्याने नियमित पाणीपुरवठा होत नाही. तसेच, अनेक भागात दूषित पाणीपुरवठा होतो. चोवीस तास पाणीपुरवठ्यानुसार पुरवठा करावा. ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. त्याचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. रस्त्यांची कामे पूर्ण करावी. ६० रुपये अतिरिक्त कराचा भुर्दंड तत्काळ रद्द करावा आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या. यानंतर मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवेदन पाठवण्यात आले. आंदोलनात मिलिंद मेश्राम, प्रभाकर मोटघरे, चारुशीला गोसावी, मीना जुमडे, सुजाता सुरडकर, सरला मेश्राम, निर्भय बागडे, सुनील इंगळे, पंकज श्यामकुळे आदी सहभागी झाले होते.