पाणीटंचाई व भविष्यातील संकट लक्षात घेता रेनवॉटर हार्वेस्टिंगवर शिक्कामोर्तब

नागपूर : पाणीटंचाई व भविष्यातील संकट लक्षात घेता आपल्या मालकीच्या सर्व इमारती व उद्यानांत रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्याचा निर्णय मनपा स्थायी समितीने घेतला आहे. शुक्रवारच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करीत, त्यासाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या योजनेंतर्गत या आर्थिक वर्षात अंदाजपत्रकात तशी तरतूदही करण्यात आली आहे.

नागपुरात अद्यापपर्यंत पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. टंचाई लक्षात घेता नियोजन हाती घेण्यात येत आहे. याअंतर्गत मनपाची सर्व झोनल कार्यालये, झोनमध्ये येणारी सर्व उद्याने, मनपाची ११७ व नासुप्रची ५५ अशी १७३ उद्याने यावर रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्यात येणार आहे. एका इमारतीवर अंदाजे अडीच ते तीन लाख खर्च अपेक्षित आहे. त्याप्रमाणे प्रत्येक इमारतीचे प्राकलन तयार करून आठवडाभरात या कामास सुरुवात करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. हे काम तातडीने करून भूगर्भात पाणीसाठा शक्य तेवढ्या लवकर जमा होईल, या गतीने करण्याचे ठरविले आहे. प्रत्येक पंधरवड्यात मुख्य अभियंत्यांनी या कामांचा रीतसर आढावा घेऊन तसा अहवाल स्थायी समितीच्या पटलावर ठेवावा, असे निर्देश स्थायी समितीने दिले.

दरम्यान, हा प्रकल्प राबविताना उद्यान विभागाचे विकेंद्रीकरण करून सर्व कामे यानंतर झोनल कार्यालयामार्फत करण्याचे निर्देशही स्थायी समितीने दिले. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी असे निर्देशही देण्यात आले आहेत. ग्रेट नाग रोडवरील नासुप्रच्या सभागृहाच्या बाजूला मनपाच्या मोकळ्या जागांवर मंदिर, वॉशिंग सेंटर, नर्सरीचे अतिक्रमण झालेले आहे, ते तातडीने काढण्यात यावे व तसा अहवालही स्थायी समितीस सादर करण्याचे निर्देशही शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात आले.

रस्ते सुधार प्रस्तावासाठी पंधरवडा

यंदाच्या अंदाजपत्रकात पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेंतर्गत रस्ते सुधार कार्यक्रमात (रस्त्यांचे डांबरीकरण, सुस्थिती व दुरुस्ती) या आर्थिक वर्षात प्रस्तावित कामांकरिता ठेवण्यात आलेला राखीव निधी ठेवण्यात आलेला आहे. यासाठी नगरसेवकांकडून प्रस्ताव मागवून एकत्रित यादी व झोननिहाय प्रस्ताव स्थायी समितीकडे पंधरवड्याच्या आत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कामांसाठी झोननिहाय निविदा काढण्यात येतील.

अधिक वाचा : नागपूर : आता येणार टायरवाली मेट्रो