नागपूर : आज रिक्षापासून ते अंतरिक्षापर्यंत प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपली छाप सोडली आहे. आज प्रत्येक परीक्षेमध्येही मुलींचाच टक्का वर असतो. अनेक मानाच्या जागांवरही महिलांचाच दबदबा आहे. मात्र आजच्या या यशोगाथेमागे केवळ सावित्रीबाई फुले यांनी केलेले संघर्ष हेच आहे, अशा शब्दांमध्ये महापौर नंदा जिचकार यांनी सावित्रीबाई फुले यांना आदरांजली अर्पण केली.
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८८व्या जयंती निमित्त महापौर नंदा जिचकार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महापौर कार्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार यांच्यासह निगम सचिव हरीश दुबे, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, महापौरांचे स्वीय सहायक संजय मेंढुले, अनुप सवाईतूल, दिलीप तांदळे, तारा मोहाडीकर, लता पाटणी, निलेश भांडारकर, शुद्धोधन घुटके, मनोज मिश्रा, रवी किंदर्ले, नरेश खरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती साधायची असेल तर आज शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. ही बाब १८४१ला हेरून महात्मा ज्योतीराव फुले यांच्या सहकार्याने मुलींना ज्ञानाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य करणा-या सावित्रीबाईंच्या कार्याची आज महती कळून येते. आपले रोजचे जगणे समृद्ध करणा-या सावित्रीबाईंचे स्मरण एखाद्या विशिष्ट दिवशीच न होता ते सदैव होत राहावे, असेही महापौर नंदा जिचकार यावेळी म्हणाल्या.
अधिक वाचा : नागपूर- नागभीड ब्रॉडगेज कामाला गती द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस