नागपूर : ‘सीसीडी’ अर्थात ‘कॅफे कॉफी डे’चे संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडल्यानंतर कंपनीने एस. व्ही. रंगनाथ यांची कंपनीच्या अंतरिम चेअरमनपदी नियुक्ती केली आहे. ८ ऑगस्ट या दिवशी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होत असून या बैठकीत पुढील रणनीती ठरविण्यात येणार आहे.
रंगनाथ सध्या कंपनीचे नॉन एक्झिक्युटीव्ह स्वतंत्र संचालक आहेत. कंपनीने नितीन बागमने यांची अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीओओ) नियुक्ती केली आहे. कंपनीच्या या नेमणुकीबाबतच्या प्रस्तावाला संचालक मंडळाची मंजुरी मिळवावी लागणार आहे.
कंपनीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एक समिती स्थापन केली असून ही समिती सीसीडीसाठीच्या नव्या संधीचा शोध घेण्याचे काम करणार आहे.
व्ही. जी. सिद्धार्थ यांच्या मागे पत्नी मालविका आणि दोन मुले आहेत. सिद्धार्थ बेपत्ता झाल्यानंतर सुमारे दोन दिवसांच्या शोधानंतर त्यांचा मृतदेह मंगळुरूतील नेत्रावती नदीत सापडला.
सिद्धार्थ यांच्या मृत्यूनंतर सीसीडीने देशभरातील आउटलेट्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सिद्धार्थ यांच्या श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने देशभरातील सुमारे २४० शहरांमधील एकूण १७५० रिटेल आउटलेट्स आज बंद ठेवण्यात आली आहेत. कर्नाटकातील चिकमंगलुरू, हसन आणि कोडुगू या तीन कॉफी उत्पादक जिल्ह्यांमध्ये कॉफीच्या सर्व मळ्यांमधील कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
कंपनीच्या समभागांमध्ये २० टक्क्यांची घसरण
सिद्धार्थ यांच्या बेपत्ता होण्यापासूनच कंपनीच्या समभागांमध्ये सतत घसरण होत आहे. आज बीएसईमध्ये कंपनीच्या समभागांमध्ये २० टक्क्यांची घसरण होऊन तो १२३.२५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. एनएसईमध्ये देखील समभागांमध्ये २० टक्क्यांची घट झाली आहे. इथे समभागाचा भाव १२२. ७५ रुपयांवर आला आहे.
व्ही. जी. सिद्धार्थ यांनी बेंगळुरूत सन १९९६ मध्ये सीसीडीचे पहिले स्टोअर सुरू केले. सध्या ‘सीसीडी’ ही भारतातील कॉफी रेस्टॉरंटची सर्वात मोठी साखळी आहे.