नागपूर : धंतोलीतील सिल्व्हर पॅलेस येथील नवोदय अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेत ३८ कोटींचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ, पदाधिकारी व काही कर्जदारांविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेसचे नेते माजी आ. अशोक धवड या कालावधीत बँकेचे अध्यक्ष होते. सहकारी संस्थेचे जिल्हा विशेष परीक्षक (भंडारा) श्रीकांत सुपे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१० ते २०१५ या कालावधीत बँकेचे तत्कालीन संचालक मंडळ, पदाधिकाऱ्यांनी बँकेच्या ठराविक कर्जदारांना विनाकारण कर्ज दिले तसेच काही कर्जदारांकडे थकबाकी असतानाही त्यांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येऊन, तारण ठेवलेल्या मालमत्तेचे दस्तऐवज त्यांना परत करण्यात आले. काही वादग्रस्त मालमत्ता तारण ठेऊन संचालक मंडळाने कर्जदरांना कर्ज दिले. संचालक व पदाधिकाऱ्यांनी बँकेतून नियमबाह्यपणे पैशांची उचल केली तसेच रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातल्यानंतरही पदाधिकाऱ्यांनी बँकेचे आर्थिक व्यवहार सुरूच ठेवले. नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार काढले.
अशा प्रकारे संचालक मंडळ, पदाधिकारी व काही कर्जदारांनी या कालावधीत ३८ कोटी ७५ लाख २० हजार ६४१ रुपयांचा घोटाळा केला. सुपे यांनी केलेल्या ऑडिटमध्ये हा घोटाळा समोर आला. सुपे यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. कट रचून फसवणूक करणे, एमपीआयडी,माहिती तंत्रज्ञान कायद्यासह विविध कलमान्वये धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिलीप फुलपगारे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
अधिक वाचा : मान्सून केरळात ६ जूनला धडकणार, महाराष्ट्रात लांबणार