नागपूर : एसटी महामंडळाच्यावतीने समाजातील विविध घटकांना सवलती देण्यात येतात. या सवलतीचे २४१.९६ कोटी रुपये महाराष्ट्र शासनाकडे थकीत आहेत. कोरोनामुळे एसटी बसेसची चाके थांबली आहेत. कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने विविध सवलतींची थकीत असलेली रक्कम त्वरित एसटी महामंडळाला देण्याची मागणी एसटी कर्मचारी आणि संघटनांच्यावतीने करण्यात येत आहे.
शासनाने परराज्यातील कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेवर पोहोचविण्यासाठी एसटी बसने मोफत प्रवास करण्याची मुभा दिली होती. या प्रवासाचा खर्च महाराष्ट्र शासन देणार होते. परंतु त्यांच्या प्रवासाचे ९४.९६ कोटी रुपये मदत व पुनर्वसन खात्याने अद्यापही दिलेले नाहीत. याशिवाय पोलीस वॉरंट, कारागृह वॉरंट, निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या बसच्या भाड्याचे १४७ कोटी रुपये शासनाकडे थकीत आहेत. ही रक्कम त्वरित महामंडळाला देऊन महामंडळावर आलेले आर्थिक संकट दूर करावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस(इंटक)चे राज्य प्रसिद्धीप्रमुख सुभाष गोजे यांनी केली.
संकट दूर करावे
‘शासनाने विविध सवलतीच्या रकमेतून ५५० कोटी रुपये एसटी महामंडळाला दिलेले आहेत. परंतु मदत व पुनर्वसन खात्याकडून ९४.९६ कोटी, तर गृह विभागाकडून १४७ कोटी रुपये येणे आहे. ही रक्कम तात्काळ एसटी महामंडळास देऊन एसटीवर आलेले आर्थिक संकट दूर करावे.’
-मुकेश तिगोटे, सरचिटणीस महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक), मुंबई