नागपूर : कन्हान नदीचे पात्र आटले असल्याची ओरड सुरू असताना एक धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला. वेकोलित काम करणाऱ्या एका कंत्राटदाराने चक्क या नदीच्या पात्रातच रस्ता बनवून पाणी प्रवाह अडविला होता. त्यामुळे सिंचन विभागातर्फे पाणी सोडल्यावरही कन्हान नदीच्या पात्रात पाणी जात नव्हते. हा प्रकार उघडकीस आल्यावर याप्रकरणी खापा पोलिसात कंत्राटदाराविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला.
नवेगाव खैरी धरण व कन्हान नदीवरील जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान सिल्लेवाडा वेकोलि परिसरात हा रस्त्या बनविण्यात आला होता. वाळू वाहून नेण्यासाठी हा रस्ता तयार करण्यात आला होता. या प्रकारामुळे कन्हान नदीवरून शहराच्या उत्तर, पूर्व आणि दक्षिणच्या काही भागाला पाणीपुरवठा होतो. परंतु, या प्रकारामुळे या भागातही पाणी टंचाईचे चित्र निर्माण झाले. पाणी असूनही व सोडूनही कन्हान नदीच्या पात्रात येत नसल्याबद्दल मनपात ओरड करण्यात येत होती.
मनपातर्फे ओसीडब्ल्यूच्या माध्यमातून पाहणी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हा रस्ता सिंचन विभागाचे कार्यालयापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या तामसवाडी येथील कक्ष अभियंता कार्यालयाजवळ बनविण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कुठलीही परवानगी नसताना अवैधपणे कंत्राटदार वाळू उपसा करीत होता. ही बाब कुणाच्याच कशी लक्षात आली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. कन्हान जलशुद्धीकरण केंद्रापासून ३७ किलोमीटर अंतरावर कोच्छी बॅरेजचे काम सुरू असल्याने कन्हान नदीचे पाणी पूर्णत: अडले आहे.
मनपाने जिल्हाधिकाऱ्यांना पाणी वितरणाचा आग्रह केल्यानंतर विदर्भ सिंचन विकास महामंडळालने कोच्छी बॅरेजमधून पाणी सोडले. परंतु, नदीच्या पात्रात पाणीच जात नव्हते. पात्रात रस्ता बनविल्याने पाणी अडून होते. खापा भागातील काही शेतकऱ्यांनी यामुळे अडलेल्या पाण्यावर कॉफर डॅम बनविले. तर, काही शेतकरी डिझेल पंपाच्या माध्यमातून पाण्याची उचल करीत होते. परिणामी, शहराला पाणी पुरवठा होत नव्हता. त्यामुळे मनपाने सिंचन महामंडळास नवेगाव धरणातून पाणी सोडण्यात सांगण्यात आले होते. या धरणाच्या १९ किलोमीटर अंतरावरील उजव्या कालव्यातून पेंचमून ७५ क्युसेस पाणी सोडण्यात आले. सोडलेले हे पाणी ३२ किलोमीटरपर्यंत नदीच्या पात्रात वाहात कन्हान इंटेक वेलपर्यंत येणार होते.
परंतु, पाणी न आल्याने ओसीडब्ल्यू आणि जलप्रदाय विभागाने नदीच्या पात्रात पाहणी केली. दरम्यान, वेकोलिचे सहायक महाव्यवस्थापक डी. एम. गोखले यांनी वाळू उपशाची कंत्राटदारास परवानगी असल्याचा दावा केला. परंतु, रस्ता बनविण्यास परवानी दिली का व कारवाई का केली नाही, याबाबत बोलण्यास नकार दिला.
अधिक वाचा : काश्मीर : चकमकीत ३ दहशतवादी ठार, जवान शहीद