नागपूर : कोरोना संसर्गाबाबत मनपा प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे. राजनगर निवासी ३५ वर्षीय एक व्यक्ती ५ ऑगस्टला कोरोना संक्रमित झाले आणि आता ते पूर्णत: दुरुस्त झाले आहे. मात्र, संक्रमणाच्या २० दिवसानंतर मनपाला संबंधित व्यक्तीचे घर प्रतिबंधित क्षेत्र करण्याचे सुचले. त्या व्यक्तीच्या घरापुढे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून बॅनर टांगण्यात आले. मनपा मंगळवारी झोनला याबाबत माहिती देण्यात आल्यानंतर ते बॅनर काढण्यात आले. मात्र, मनपाच्या या बेजबाबदार कृत्याने संबंधित व्यक्तीला सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत व्हावे लागले. बॅनर लागताच शेजारपाजारच्या लोकांमध्ये त्यांच्याविषयीची वागणूकही बदलली आहे. दूध, भाजीपाला, फळवाले त्यांच्या घराजवळ भटकतही नाहीत. मनपामुळे त्यांना मानसिक आणि भावनिकदृष्ट्या तणावाचा सामना करावा लागत आहे. ही भरपाई कोण करेल, हा प्रश्न आहे.
मनपा प्रशासनाच्या बेजबाबदारीची अनेक प्रकरणे सातत्याने पुढे येत असतात. त्याच शृंखलेत आता या प्रकरणाने कोरोना संदर्भात मनपा कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागले आहे.
राजनगर येथील एका इमारतीत राहणाºया ३५ वर्षीय व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट ५ ऑगस्टला पॉझिटिव्ह आला होता. मनपाद्वारे त्यांना तात्काळ क्वारंटाईन करण्यात आले. त्यांच्यात कोणतीच लक्षणे आढळून न आल्याने, त्यांना एक दिवसानंतर होम क्वारंटाईन करण्यात आले. दुसºया दिवशी त्यांच्या कुटुंबीयांचेही नमुने तपासण्यात आले. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. नियमानुसार दहा दिवसानंतर पॉझिटिव्ह रुग्णाला स्वस्थ घोषित करण्याचे आयसीएमआरने दिशानिर्देश जारी केले आहेत. मात्र, या रुग्णांला दहा दिवसानंतर तपासण्यास मनपाकडून कुणीच आले नाही. सजगता म्हणून त्यांनी स्वत:च तपासणी करवून घेतली. यावेळी त्यांनी रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांच्या जिवात जीव आला. मात्र, मनपाच्या या बेजबाबदार धोरणामुळे मनपाचे कोरोना संदर्भातील कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
संक्रमिताचा कुणीच नाही विचारला हालहवाल
होम क्वारंटाईन व्यक्तीच्या आरोग्याची वेळोवेळी माहिती घेण्यासाठी मनपाची एक टीम आहे. मात्र, राजनगरमधील या संक्रमित व्यक्तीला बघण्यासाठी मनपाकडून कुणीच आले नाही. विना तपासणी सात दिवसानंतर संबंधित रुग्ण स्वस्थ झाल्याचे मनपाकडून घोषितही करण्यात आले.
घोळ कुठे झाला, याची चौकशी करतो – राऊत
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी झोनच्या सहायक आयुक्तांना प्रतिबंध लावणे व काढण्याचे अधिकार दिले आहेत. मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत आहेत. या संदर्भात त्यांना ‘लोकमत’ने विचारणा केली असता, त्यांनी इंजिनिअर्सच्या बदल्या होत असल्याचे सांगितले. त्यामुळेच, यादी उशिरा मिळाली असल्याने हा घोळ झाल्याची शक्यता असल्याचे सांगितले. चूक नक्कीच झाली. मात्र, घोळ कुठे झाला याची चौकशी करतो, असे आश्वासन त्यांनी दिले. या संदर्भात अप्पर आयुक्त राम जोशी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी फोन उचलला नाही.