‘हॅलो डॉक्टर, तुम्ही पैशांची काळजी करू नका. ‘रेमडेसिव्हिर‘च काय आणखी कोणतेही इंजेक्शन लिहून द्या. आम्ही आणून देतो; पण माझे वडील वाचले पाहिजेत…’
‘डॉक्टर, मला फारसा त्रास होत नाहीये. गृह विलगीकरणात राहून उपचार घेऊ शकतो. जमले तर रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणून देतो. त्याचा कोर्स करू…’
हे आणि असे कित्येक संवाद सध्या प्रत्येक छोट्या-मोठ्या रुग्णालयात आणि गृह विलगीकरणामध्ये असलेल्या डॉक्टर-रुग्ण संवादांतून ऐकायला मिळत आहेत. डॉक्टरांप्रमाणे रुग्णांचे नातेवाइक ‘पॅनिक मोड’मध्ये असल्याने काहीही करून ‘रेमडेसिव्हिर’ने रुग्ण बरा होईल, अशी धारणा त्यांनी करून घेतली आहे.
मात्र, ‘रेमडेसिव्हिर इंजेक्शन कधी द्यायचे, याचे नियम निश्चित करण्यात आले आहेत. रेमडेसिव्हिर इंजेक्शन हे रामबाण औषध नाही. हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या प्रत्येक रुग्णाला ‘रेमडेसिव्हिर’ द्यायची गरज नाही,’ अशा शब्दांत वैद्यकीय तज्ज्ञांनी नातेवाइकांसह डॉक्टरांना ताकीद दिली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी रुग्णाच्या नातेवाइकांना सबुरीची सल्ला दिला असून ‘रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा वापर जपूनच करायला हवा,’ असेही स्पष्ट केले आहे.
राज्य आणि पुणे जिल्हा टास्क फोर्स समितीने रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा वापर कधी करावा याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. त्यानुसार शहरातील मोठ्या रुग्णालयांमधून त्याचे पालन केले जात आहे. मात्र, छोट्या रुग्णालयांमधून या नियमांचे पालन होताना दिसत नाही. परिणामी रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी नातेवाइकांचा येणारा दबाव, अनेकदा रुग्णाची प्रकृती खराब होईल की काय अशी भीती यातून डॉक्टरांना ‘रेमडेसिव्हिर’ देण्याची गरज वाटते. त्यामुळे ‘रेमडेसिव्हिर’ वापराबाबतचे मार्गदर्शक तत्त्वे धाब्यावर बसवून इंजेक्शनचा वापर होत असल्याने तुटवडा निर्माण झाल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले.
विनाकारण भीती नको रुग्णाची सीटी स्कोअर किती आहे, त्याची ऑक्सिजनची पातळी कमी होत आहे का, या बाबी तपासल्यानंतर वैद्यकीय तज्ज्ञ उपचारांचा निर्णय घेतात. मात्र, अनेकदा नातेवाइकच रेमेडसिव्हिर इंजेक्शनची देण्याची आग्रही मागणी करतात. त्यामुळे नाइलाजास्तव रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्याची वेळ येते, असे काही डॉक्टरांनी खासगीत सांगितले. त्यामुळे नातेवाइकांनी विनाकारण घाबरून जाऊ नये; तसेच रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्याची मागणी करू नये, असाही सल्लाही डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाइकांना दिला.
प्रीस्क्रिप्शनच्या स्वरूपात बदल ‘रुग्णाला रेमडेसिव्हिर इंजेक्शन कधी द्यावे, याबाबत आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी प्रीस्क्रिप्शनचे स्वरूप बदलले आहे. रुग्णाचा सिटी स्कोअर, ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे हे प्रीस्क्रिप्शनवर लिहिणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे ‘रेमडेसिव्हिर’चा अतिरेकी वापर अथवा दुरुपयोग कमी होऊ शकतो,’ अशी माहिती पुणे टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष डॉ. डी. बी. कदम यांनी दिली.
‘रेमडेसिव्हिर’ची गरज १५ टक्के रुग्णांना ‘रुग्णाला लक्षणे कधी आढळली, त्याला ऑक्सिजनची गरज आहे का, त्याचे वय अधिक आहे का, त्याला अन्य आजार असून तो लवकर बरा होऊ शकतो का, याचा सारासार विचार केला तर ‘रेमडेसिव्हिर’चा योग्य वापर करता येऊ शकतो. असे झाल्यास इंजेक्शनचा दुरुपयोग टाळता येईल. ‘रेमडेसिव्हिर’च्या वापराबाबत लोकशिक्षण झाले पाहिजे,’ अशी सूचना संसर्गरोगतज्ज्ञ डॉ. अमित द्रविड यांनी केली. खरे तर ८५ टक्के रुग्णांना ‘रेमडेसिव्हिर’ची गरजच नाही. परंतु, १५ टक्के रुग्ण कोणते हे निदान करणे गरजेचे आहे. सध्या या गरजू रुग्णांना सोडून इतर रुग्णांना रेमडेसिव्हिर देण्यात येत असल्याने तुटवडा निर्माण झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.