करोना रुग्णांवर उपचार करणारी कोविड रुग्णालये आणि नर्सिंग होम्स यांना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. दोन लाखांवरील व्यवहारांवर सरकारने बंदी घातलेली आहे. मात्र, कोविड रुग्णालये, नर्सिंग होम्स आणि कोविड सेंटर्ससह यांना ठराविक कालावधीसाठी दोन लाखांवरील बिलं रोखीने घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.
कोविडच्या काळात करोना रुग्णांना सेवा देणाऱ्या रुग्णालये, मेडिकल, नर्सिंग होम्स, कोविड केअर सेंटर्स आणि कोविड रुग्णांना सेवा देणाऱ्या इतर समकक्ष वैद्यकीय संस्थांना दोन लाखांवरील व्यवहार करण्यास मूभा देण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने हा निर्णय घेतला आहे. यासाठी रुग्णांचे नाव आणि बिल देणाऱ्या व्यक्तीचे आधार वा पॅन कार्ड यांची माहिती आणि त्यांच्यातील नातेसंबंध याची माहिती द्यावी लागणार आहे.
१ एप्रिल ते ३१ मे या कालावधीतच असे व्यवहार करण्यास मूभा देण्यात आली असून, यासंदर्भातील अधिसूचनाही काढण्यात आली आहे. आयकर कायद्यातील अधिनियम २६९एसी नुसार दोन लाखांच्या पुढे रोखीने व्यवहार करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र, दोन महिन्यांच्या कालावधीसाठी यातून कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना मूभा देण्यात आली आहे.
करोनाचा रौद्रावतार दुसऱ्या लाटेमुळे भारतातील परिस्थिती भयंकर होऊ शकते, हा विविध तज्ज्ञ आणि संस्थांनी दिलेला इशारा खरा ठरताना दिसत आहे. दिवसेंदिवस देशात रुग्णसंख्या आणि मृतांची संख्या प्रचंड वेगानं वाढू लागली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील गेल्या २४ तासांतील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात २४ तासांत चार लाख एक हजार ७८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन लाख १८ हजार ६०९ रुग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, चिंतेची बाब म्हणजे देशात पहिल्यांदाच चार हजार १८७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. देशातील एकूण मृतांची संख्या दोन लाख ३८ हजार २७० इतकी झाली आहे.