नागपूर – पोलिसांचा गणवेश घालून ‘वसुली’

नागपूर : पोलिसांचा गणवेश घालून वाहनचालकांकडून वसुली करणाऱ्या तोतया पोलिसाला लकडगंज पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांचे बनावट ओळखपत्र, रोख व मोटरसायकल जप्त करण्यात आली. दिलीप उद्धवराव टापरे (वय ३२, रा. गाडगेबाबानगर, रमणा मारोती) असे अटकेतील तोतयाचे नाव आहे.

बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास गंगा-जमना वेश्यावस्ती भागात दिलीप हा पोलिसांचा गणवेश घालून वाहनचालकांकडून वसुली करीत होता. तो एकटाच कारवाई करीत असल्याने येथील नागरिकांना संशय आला. नागरिकांनी लकडगंज पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळताच लकडगंज पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राम बांदेकर, उपनिरीक्षक कृष्णराव कणकदळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून दिलीपला अटक केली.

त्याच्याकडून एमएच-डीडब्ल्यू- २६११ या क्रमांकाची मोटरसायकल, बनावट ओळखपत्र, मोबाइल व दोन हजार ६०० रुपयांची रोख जप्त केली. त्याच्याविरुद्ध तोतयागिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.

पोलिस असल्याचे सांगून केले लग्न

दिलीप हा गेल्या चार वर्षांपासून पोलिस असल्याची बतावणी करीत आहे. शरीरयष्टीमुळे तो पोलिसांसारखाच दिसतो. बी.ए. उत्तीर्ण असलेल्या दिलीपने पोलिस असल्याचे सांगूनच लग्न केले. सकाळी ९ वाजताच्या सुमारास ड्युटीवर जात असल्याचे सांगून गणवेश घालून तो घरून निघायचा.

रात्री १० वाजता परत घरी जायचा. राणी दुर्गावती चौक व गंजा-जमना भागात त्याने दारू पिऊन वाहन चालविणे, सिग्नल तोडणे व हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांकडून ‘वसुली’ केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अधिक वाचा : घटिया खाद्य पदार्थ बनाने पर एक लाख का जुर्माना