नागपुर: चलनी नोटांमध्ये आपल्या जांभळ्या रंगामुळे लक्ष वेधून घेणारी १०० रुपयांची नोट आता आणखी लखलखणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १०० रुपयांच्या नोटांना वार्निशचा कोट देण्याचं ठरवलं आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर काही नोटांना कोटिंग केलं जाईल. नोटांचं आयुष्य वाढवण्यासाठी आरबीआय हा प्रयोग करत आहे. प्रयोग यशस्वी झाल्यास १०० रुपयांच्या सर्व नोटांना वॉर्निश कोट लावला जाईल.
वॉर्निश लावण्याचा हा प्रस्ताव आरबीआयच्या वार्षिक अहवालात नमूद करण्यात आला आहे. हा अहवाल गुरुवारी जारी झाला. यासारख्या आणखी काही कल्पक योजना आरबीआय नोटांसाठी आणणार आहे. अंधांना हाताळता याव्यात यासाठी नोटा अधिक सोयीस्कर बनवण्याचाही आरबीआयचा प्रयत्न आहे. अहवालात असं म्हटलंय की इनटाग्लिओ प्रिंटींग, टॅक्टिकल मार्क, आकार, मोठे आकडे आदि विविध गोष्टींचा वापर करून अंध, अंशत: अंधांसाठी या नोटा हाताळणं अधिक सुकर करण्यात येणार आहे.
मुंबईत एक बँक नोट क्वालिटी अॅश्युअरन्स प्रयोगशाळा देखील स्थापन करण्यात आली आहे. नोटांच्या गुणवत्तेकडे ही प्रयोगशाळा लक्ष केंद्रित करणार आहे.